अतूट नात्याची वेदनादायी कहाणी; बहिणीनंतर भावाचाही हृदयविकाराने मृत्यू; बहिणीला निरोप देतानाच भावानेही घेतला अखेरचा श्वास; दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर...
Mar 13, 2026, 10:46 IST
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याची वेदनादायी कहाणी साखरखेर्डा येथे घडली. बहिणीच्या अंत्यसंस्कारानंतर काही क्षणातच धाकट्या भावालाही हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याने सुरळकर आणि ढोबळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुहेरी दु:खद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
येथील श्रीमती शशिकला रामकृष्ण सुरळकर (वय ८०) यांचे ११ मार्च रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता साखरखेर्डा येथील श्री रोकडोबा हनुमान मंदिरामागील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बहिणीच्या अखेरच्या निरोपासाठी यवतमाळ येथील त्यांचे धाकटे बंधू राम नामदेव ढोबळे विशेषतः उपस्थित होते. अंत्यसंस्काराची विधी पूर्ण झाल्यानंतर सर्वजण घरी परतले. मात्र काही वेळातच राम ढोबळे यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी डॉ. मगर यांच्याकडे नेण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बहिणीच्या निधनाच्या दुःखातून सावरायच्या आतच भावानेही जगाचा निरोप घेतल्याने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. बहिणीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या भावाने जणू तिच्याच पाठोपाठ जाण्याचा निर्णय घेतल्यासारखी ही घटना असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
दरम्यान, राम नामदेव ढोबळे यांचा मृतदेह पुढील विधीसाठी यवतमाळ येथे नेण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे भाऊ-बहिणीच्या नात्याची भावनिक आणि वेदनादायी आठवण परिसरातील नागरिकांच्या मनात कायमची कोरली गेली आहे.