गावांच्या विकासाला नवे बळ – 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान'चा भव्य शुभारंभ किन्होळा येथून! महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचाही लाभ...
Updated: Sep 17, 2025, 16:22 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व महात्मा गांधी जयंती ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याच्या उपक्रमांतर्गत 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान'चा भव्य शुभारंभ आज मौजे किन्होळा येथे झाला.
या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाकडून रोख पुरस्कार तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान होणार आहे. यामुळे गावोगावी प्रगतीचा नवा अध्याय सुरू होणार असून गावपातळीवर स्पर्धात्मकतेतून विकासाला गती मिळणार आहे.
याच अनुषंगाने महिलांसाठी विशेष मोफत आरोग्य शिबिर देखील आज किन्होळा येथे पार पडले. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सकाळी ८.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत घेतलेल्या या शिबिरात फिजिशियन, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ तसेच शल्य चिकित्सक अशा विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. अनेक माताभगिनींनी या शिबिराचा लाभ घेतला.
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी या अभियान व शिबिराचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे गावकऱ्यांना दर्जेदार सुविधा मिळणार असून विकासकामांना गती मिळेल. तर महिलांसाठी आरोग्य शिबिर हे केवळ उपचारापुरते मर्यादित नसून त्यातून जागरूकताही वाढेल. ग्रामविकासासोबत आरोग्यदायी समाज हा खरा आत्मनिर्भरतेचा पाया आहे."
गावांचा विकास, महिलांचे आरोग्य व सर्वांगीण प्रगती यांचा संगम घडवणारे हे उपक्रम ग्रामपंचायतींना व स्थानिक जनतेला नवे बळ देणारे ठरणार आहेत.
या सोहळ्यात माजी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, सोसायटी अध्यक्ष, शाळा समिती अध्यक्ष यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. अर्चनाताई जाधव, गटविकास अधिकारी श्री. समाधान वाघ, सद्य गटविकास अधिकारी श्री. गजानन पोफळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. पंजाबराव धनवे, प्रा. श्री. वीरेंद्र वानखेडे, ग्रामसेवक श्री. मदन कुटे, सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी व सत्कारमूर्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.