झाडाखाली पडला आंब्यांचा सडा! गारपीट आणि अवकाळी पावसाने फळबागांचे मोठे नुकसान! चिखली तालुक्यातील शेलुद येथील शेतकऱ्याची व्यथा..

 
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)– बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठे थैमान घातले.  मागील दोन-तीन दिवसांत पडलेल्या पावसामुळे आणि गारपीटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांचेही फार मोठे नुकसान झाले असून फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

शेलुद येथील शेतकरी राजेंद्र वाघमारे यांच्या दीड एकर क्षेत्रातील आंबा बागेवर गारपीट आणि अवकाळीचा जबरदस्त फटका बसला. त्यांच्या बागेत यावर्षी भरघोस उत्पादन होण्याची शक्यता होती आणि लाखो रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र गारपीट झाल्यानंतर झाडाखाली अक्षरशः आंब्यांचा सडा पडलेला दिसत आहे. झाडांवर एखादा-दोन आंबा शिल्लक असला, तरी त्यांनाही फटका बसल्याने ते सुद्धा खाली गळण्याची शक्यता आहे.

या नुकसानीमुळे वाघमारे यांच्यासारखे अनेक फळबाग उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अवकाळी व गारपीट ही नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्या उमेदीवर पाणी फेरत असून शासनाने वेळेत मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.