शेगावात एक कोटींच्या निधीतून साकारणार ‘फूड स्ट्रीट’! भाविकांना मिळणार स्वच्छ, सुरक्षित खाद्यपदार्थ;
महिला बचत गट, छोट्या व्यावसायिकांनाही मिळणार नवी संधी; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) पश्चिम विभागाच्या सहकार्याने आज, २४ नोव्हेंबर रोजी शेगाव येथे महिला बचत गट, लघुउद्योजिका आणि पथविक्रेत्यांसाठी विशेष प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना जाधव यांनी खाद्यव्यवसायात अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. ग्राहकांचा विश्वास हीच कोणत्याही व्यवसायाची खरी ताकद आहे. चवीसोबतच गुणवत्ता आणि स्वच्छता जपल्यास स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक महिला बचत गट मसाले, लोणची, पापड, मिठाई आणि विविध घरगुती खाद्यपदार्थांच्या माध्यमातून व्यवसाय करीत आहेत. या महिलांना स्वावलंबी बनविण्यासोबतच त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छ पाण्याचा वापर, योग्य साठवणूक, वैयक्तिक स्वच्छता आणि व्यवसाय परिसराची स्वच्छता याबाबत व्यावसायिकांनी विशेष काळजी घ्यावी. ग्राहकांना खाद्यपदार्थ देताना त्यांच्या आरोग्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे, असे जाधव म्हणाले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अन्नसुरक्षा मानके, सुरक्षित अन्न हाताळणी, खाद्यपदार्थांची साठवणूक, आवश्यक नोंदणी आणि परवाने याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यापूर्वीही अशा दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सेवा सप्ताहांतर्गत आयोजित हा तिसरा उपक्रम आहे. ‘ईट राईट इंडिया’ अभियानाच्या माध्यमातून सुरक्षित, आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्नाबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. महिला बचत गटांनी उत्पादनांची गुणवत्ता आणि पॅकेजिंग सुधारावे, तसेच प्रशिक्षणानंतरही FSSAI च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक व्यावसायिकांना सातत्याने मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सेवा सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे जाधव यांनी सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील खाद्यव्यवसायिकांची ओळख केवळ चवीसाठी नव्हे, तर स्वच्छता आणि गुणवत्तेसाठीही निर्माण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला FSSAI पश्चिम विभागाच्या प्रादेशिक संचालिका प्रीती चौधरी (IRS), उपसंचालक वैद्यही काळझुणकार, सहायक संचालक ज्योती हरणे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, शेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, लघुउद्योजिका आणि पथविक्रेते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या FSSAI च्या संपूर्ण चमूचे केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी विशेष आभार मानले.