निकृष्ट बियाण्यांवर मोठा घाव! बुलढाणा जिल्ह्यात ५ कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल; आणखी कंपन्यांवरही कारवाईची शक्यता...
यंदा जिल्ह्यातील अनेक भागांत सोयाबीनची उगवण अत्यंत कमी झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने विविध ठिकाणांहून बियाण्यांचे नमुने संकलित करून ते अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. प्रयोगशाळेच्या अहवालात संबंधित बियाणे आवश्यक दर्जाचे नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कृषी विभागाने संबंधित कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली.कृषी विभागाच्या तक्रारीवरून रवी सीड्स, बूस्टर सीड्स, ईगल सीड्स, पार्श जेनेटिक्स आणि यशोदा सीड्स या पाच कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, कृषी विभागाकडून इतर कंपन्यांच्या बियाण्यांच्या नमुन्यांची तपासणी आणि चौकशीही सुरू आहे. संबंधित नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणखी काही कंपन्यांविरोधातही गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी दिली.निकृष्ट बियाण्यांच्या मुद्द्यावर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने दोषी कंपन्यांवर कारवाईचा फास आणखी आवळण्याची चिन्हे आहेत. आता पुढील प्रयोगशाळा अहवालांकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.