दहशत निर्माण करणाऱ्या अस्वलाला पिलासह केले जेरबंद; वनविभागाच्या पथकाची कारवाई; ज्ञानगंगा अभयारण्यात दिले सुरक्षीत साेडून..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गत काही दिवसांपासून दहीगाव, करणखेड आणि मातमखेड परिसरात हैदाेस घालणाऱ्या अस्वलाला पिलासह जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला ८ सप्टेंबर राेजी यश आले. त्यामुळे, परिसरातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना सुटकेचा श्वास साेडला. या अस्वलाला पथकाने ज्ञानगंगा अभयारण्यात सुरक्षीतपणे साेडून दिले.  
 बुलढाणा वनपरिक्षेत्रातील दहीगाव, करणखेड आणि मातमखेड परिसरात मादी अस्वल आपल्या पिलासह शेतशिवारात फिरत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकरी व शेतमजूर यांना शेतात जाण्यास धास्ती वाटत होती. त्यामुळे संबंधित गावातील सरपंचांनी वनविभागाकडे तक्रार करून अस्वल व पिलाला पकडण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर बुलढाणा डीएफओ सरोज गवस यांच्या आदेशानुसार एसीएफ वैभव काकडे व बुलढाणा आरएफओ सुनील वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथक नेमण्यात आले. शूटर संदीप मडावी, अमोल चव्हाण, पवन वाघ, पवन मुले, प्रमोद गवई, राणी जोगदंड व प्रमोद सावले यांनी ६ सप्टेंबर रोजी दहीगाव परिसरात मोर्चा वळवला.
सायंकाळी पाचच्या सुमारास मादी अस्वल आपल्या पिलासह आंब्याच्या झाडावर बसलेली आढळून आली. पथकाने मादी अस्वलला डार्ट मारून बेशुद्ध केले, तर पिलाला प्रत्यक्ष पकडून सुरक्षित केले. झाडावरच अस्वल बेशुद्ध झाल्याने दोरखंडाच्या साहाय्याने ते खाली उतरवण्यात आले. दोन्ही अस्वलांना पिंजऱ्यात ठेवून प्रथम बुलढाणा वनविभागाच्या राणीबागेत नेण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ७ सप्टेंबर रोजी मादी अस्वल व तिच्या पिलाला बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा (ज्ञानगंगा) अभयारण्यात सुरक्षित सोडण्यात आले. या कारवाईनंतर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला.