चांडोळमध्ये ९०० ते ११०० वर्षे जुन्या जैन तीर्थंकर मूर्ती भग्नावस्थेत; प्राचीन मंदिराचे अवशेषही दुर्लक्षित, तातडीने जतन-संवर्धन करण्याची जैन समाजाची पुरातत्त्व विभागाकडे मागणी...
यासंदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच पुरातत्त्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. चांडोळ येथील नृसिंह व विठ्ठल-रुक्माई संस्थान मंदिर परिसरात जैन तीर्थंकरांच्या प्राचीन मूर्ती आणि मंदिराचे अवशेष आढळून आले आहेत.
या ठिकाणी एक मूर्ती कायोत्सर्ग (खड्गासन) मुद्रेत उभी असून, दोन मूर्ती पद्मासन ध्यानमुद्रेत बसलेल्या आहेत. याशिवाय प्राचीन मंदिराचे स्तंभ, शिखराचे तुकडे तसेच नक्षीकाम केलेले दगडही आढळून आले आहेत. या मूर्ती काळ्या बेसॉल्ट दगडातील असून, त्या साधारणतः १०व्या ते १२व्या शतकातील यादवकालीन हेमाडपंथी स्थापत्यशैलीशी संबंधित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मूर्ती सुमारे ९०० ते ११०० वर्षे जुन्या असल्याचेही संस्थेने म्हटले आहे.मात्र सध्या या मौल्यवान मूर्ती मंदिर परिसरातच भग्नावस्थेत पडून असल्याने त्यांची नासधूस किंवा चोरी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या ऐतिहासिक व धार्मिक वारशाचे तातडीने संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुरातत्त्व विभागाने संयुक्त पाहणी करून शास्त्रोक्त संवर्धन करावे
चांडोळ येथील जैन मूर्ती आणि मंदिर अवशेषांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, संबंधित ठिकाणी तातडीने पंचनामा करून मूर्ती सुरक्षित व संरक्षित ठिकाणी हलवाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), नागपूर मंडळ आणि महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून या प्राचीन वास्तू व मूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन व संवर्धन करावे, अशी अपेक्षा जैन समाजाने व्यक्त केली आहे.
तसेच चांडोळ येथील या स्थळाला प्राचीन स्मारक म्हणून संरक्षित घोषित करून त्याच्या संवर्धनाची प्रक्रिया सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील जीपीएस फोटो आणि पीडीएफ स्वरूपातील कागदपत्रेही प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहेत.जैन समाजाच्या धार्मिक भावनांशी तसेच बुलडाणा जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशाशी संबंधित असलेल्या या प्राचीन मूर्ती पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित राहाव्यात, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी जैन समाजातून होत आहे.