लोकअदालतीत ७९६३ प्रकरणांचा निपटारा; तब्बल २३.३९ कोटींचा दंड वसूल..!
Sep 15, 2025, 10:09 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा तथा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने १३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी तब्बल ७,९६३ प्रकरणांचा निपटारा होऊन २३ कोटी ३९ लाख ४३ हजार २०७ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.
जिल्हा न्यायालय, बुलढाणा येथे विविध पॅनलद्वारे दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली. त्यात ६,७०१ दाखलपूर्व प्रकरणे आणि १,२६२ प्रलंबित प्रकरणे निकाली काढली गेली. दाखलपूर्व प्रकरणांतून ₹२.९८ कोटी तर प्रलंबित प्रकरणांतून ₹२०.४१ कोटी वसूल करण्यात आले.
या लोकअदालतीत मोटार अपघातासंबंधी अनेक प्रकरणे निपटली. त्यात एक महत्त्वाच्या खटल्यात (क्र. १३/२०२५ गणेश पांडुरंग सुरोशे विरुद्ध दत्तात्रय इतर) रॉयल सुंदरम इंश्युरन्स कंपनीतर्फे अर्जदारास ₹२४ लाखांचा मोबदला देण्यात आला.
या यशस्वी उपक्रमाचे आयोजन पालक न्यायमुर्ती व मा. उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एम. एम. नेरलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. आयोजनासाठी जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, वकील संघ, बँक अधिकारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितीन पाटील आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.