चिखली तालुक्यातील ५० हजार ५८३ शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ! ई-पंचनामा पोर्टलद्वारे अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू; बँक खाते आधार संलग्न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

 
 बुलढाणा(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत ५० हजार ५८३ शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले आहे. ई-पंचनामा पोर्टलवरील प्राप्त माहितीच्या आधारे पात्र शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याची कार्यवाही तहसील कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

चिखली तालुक्यातील शासनाच्या ई-पंचनामा पोर्टलनुसार एकूण ९६ हजार २२६ शेतकऱ्यांची माहिती प्राप्त झाली आहे. यापैकी ८० हजार २५५ शेतकऱ्यांना सानुग्रह निधी वितरणासाठी ई-पंचनामा पोर्टलवर गावनिहाय पात्र करण्यात आले आहे. प्राप्त माहितीमध्ये २६ हजार २८५ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी वारंवार नोंदविले गेलेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात एकमेव फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ५३ हजार ९७० आहे.

या ५३ हजार ९७० शेतकऱ्यांपैकी ई-पंचनामा पोर्टलवर पात्र ठरलेल्या ५० हजार ५८३ शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान प्राप्त झाले आहे. तर १ हजार ११७ शेतकऱ्यांचे अनुदान बँक खात्याशी संबंधित तांत्रिक कारणांमुळे रिजेक्ट झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार संलग्नता (सीडिंग), मॅपिंग आणि डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय १ हजार ४३२ शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू असून ८३८ शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित आहे.दरम्यान १५ हजार ९७१ शेतकऱ्यांच्या प्रकरणांमध्ये सामाईक खातेदार, मृत खातेदार तसेच कालावधीत झालेल्या शेतीच्या खरेदी-विक्रीमुळे मालकी हक्कात बदल झालेला आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित खातेदारांची संमती प्राप्त होईपर्यंत ई-पंचनामा पोर्टलवर ही प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत,अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.