

बुलडाणा जिल्ह्यातील ४९ पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षित! "आम्हाला घरी घेऊन जा" पर्यटकांची शासनाकडे विनंती....
Apr 23, 2025, 20:43 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जम्मू कश्मीरच्या पहेलगामध्ये काल मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदू पर्यटकांची हत्या केली. या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. दरम्यान बुलढाणा जिल्हा प्रशासनाने या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून जम्मू कश्मीरमध्ये अडकलेल्या जिल्ह्याच्या पर्यटकांसोबत संपर्क साधण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४९ पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकल्याची माहिती नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली आहे..सर्वच पर्यटक सुरक्षित आहेत.
नांदुरा तालुक्यातील २५, शेगाव तालुक्यातील ३, खामगाव तालुक्यातील १७, जळगाव जामोद तालुक्यातील ४ पर्यटकांची माहिती नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली आहे. या पर्यटकांची माहिती राज्य शासनाला देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन देखील या पर्यटकांच्या सातत्याने संपर्कात असून त्यांना परत जिल्ह्यात आणण्याच्या उपाययोजना सुरू करण्यात आले आहेत.