बुलढाण्यात २३ रुग्णवाहिका चालकांचा बेमुदत संप सुरू; वेतन व सेवा अटींसाठी आंदोलन! जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेवर होणार परिणाम...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "समान काम, समान वेतन" या तत्त्वावर आधारित विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातील २३ रुग्णवाहिका चालकांनी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपाला सुरुवात केली. टिळक नाट्य क्रीडा मैदानावर हे चालक आंदोलनाला बसले असून, रुग्णवाहिका सेवा ठप्प झाल्याने जिल्ह्यात आपत्कालीन वैद्यकीय सेवांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

१०८ रुग्णवाहिका चालक युनियन (सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न) यांनी वेतन वाढ, दुप्पट ओव्हरटाईम दर, कॅशलेस आरोग्य विमा, ८.३३% वार्षिक बोनस, पाच वर्षानंतर ग्रॅज्युटी आणि फुल अलाउन्स देण्याच्या मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. विशेष म्हणजे, युनियनने १४ ऑक्टोबर २०२४ रोजीच संबंधित मागण्यांची सूचना दिली होती, परंतु अद्याप त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप आहे.
रुग्णवाहिका चालकांचे म्हणणे आहे की, बीव्हीजी कंपनी मार्फत दिले जाणारे वेतन अत्यल्प असून, अतिरिक्त तासांचे काम करूनही त्याला न्याय्य मोबदला मिळत नाही. याशिवाय, जुन्या रुग्णवाहिकांची अवस्था अत्यंत खराब असून, नवीन वाहने त्वरित उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.संपामुळे जिल्ह्यातील आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता असल्याने प्रशासनासाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत आहे. दरम्यान, कंपनी व आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. रुग्णांचे हाल टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून समाधानकारक तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.