जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांना मिळणार १२१ काेटींची मदत; आतापर्यंत २१९ कोटी ७० लाख रुपयांची मदत; पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांची माहिती..!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या १ लाख ८२ हजार ३६८ शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीपोटी १२१ कोटी ८९ लाख ४३ हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय २३ सप्टेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे. 
 आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपोटी जिल्ह्यातील बाधितांना २१९ कोटी ७० लाख ८२ हजार रुपये इतका मदत निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथ‍ा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांप्रती शासन संवेदनशील असून अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी मदत निधीला मान्यता दिली आहे.
यापुर्वी २२ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार अवेळी पाऊसामुळे बाधित १४ हजार ९०९ शेतकऱ्यांना १५ कोटी ५५ लाख ५० हजार रुपये इतका मदत निधीस मान्यता दिली आहे.
तसेच ६ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे बाधित ९० हजार ३८३ शेतकऱ्यांना ७४ कोटी ४५ लाख ३ हजार रुपये इतका निधी तर १७ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे बाधित ८ हजार ३९७ शेतकऱ्यांना सात कोटी ८० लाख ८६ हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच आज दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीतील जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरामुळे बाधित १ लाख ८० हजार ३६८ शेतकऱ्यांना १२१ कोटी ८९ लाख ४३ हजार रुपये निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन संवेदनशील
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांप्रती शासन संवेदनशील असून सद्या बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टी झाल्याचे निदर्शनास आले असून या नुकसानग्रस्त भागातील बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पिकांचे तत्काळ पंचनामे करुन मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवावा, असे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच यापूर्वी झालेल्या अवेळी पाऊस, अतिवृष्टी, पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतपिकांचे तातडीने पंचनामे केल्याने बाधित शेतकऱ्यास दिलासा मिळाले आहे, अशी भावना मदत व पुनर्वसन मंत्री तथ‍ा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांनी व्यक्त केली.