ईद मिलादुन्नबीनिमित्त १४३ रक्तदात्यांनी रक्तदान केले; अल मदिना एज्युकेशन फाउंडेशनचा एक स्तुत्य उपक्रम..!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ईद मिलादुन्नबी म्हणजेच पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त, रविवार, ३१ ऑगस्ट रोजी इक्बाल चौक जामा मशिदीजवळ अल मदीना एज्युकेशन फाउंडेशनने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात १४३ रक्तदात्यांनी रक्तदान करून पैगंबर मोहम्मद साहेब यांना आदरांजली वाहिली.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अल मदिना एज्युकेशन फाउंडेशनकडून हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावर्षी पैगंबर साहेब यांच्या १५०० व्या जयंतीचे विशेष महत्त्व असल्याने, ईद मिलादुन्नबी देशभर आणि जगात उत्साहात साजरी केली जात आहे. १५०० व्या जयंती स्मरणीय करण्यासाठी आणि समाजातील गरजू लोकांना मदत करण्यासाठी, अल मदिना फाउंडेशनकडून विविध सामाजिक कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, रविवार, ३१ ऑगस्ट रोजी स्थानिक इक्बाल चौक जामा मशिदीच्या मैदानात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सुमारे १४३ रक्तदात्यांनी रक्तदान करून पैगंबर मोहम्मद साहेब यांना आदरांजली वाहिली. जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा आणि उपजिल्हा रुग्णालय खामगावच्या दोन पथकांनी रक्त संकलनात सहकार्य केले. यावेळी विविध सामाजिक, राजकीय आणि धार्मिक मान्यवरांनी रक्तदान शिबिराला भेट दिली तर अल मदिना एज्युकेशन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी रक्तदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे प्रयत्न केले.