२ वर्षे होऊन गेले "त्या" दोघींच्या मारेकऱ्यांचा अजून शोध नाही! ओळखही नाही पटली..अंढेरा आणि किनगाव राजा पोलिस स्टेशन हद्दीतही खून करून अर्धवट जाळले होते मृतदेह!

 राजुरा हत्याकांडाने जागवल्या आठवणी.. एसपी निलेश तांबेकडून अपेक्षा.. तपास मोठ्या अधिकाऱ्याकडे देण्याची गरज..!
 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात २६ एप्रिलला "धडा वेगळे शीर " आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह सापडला होता..त्यानंतर तिची ओळख शिवानी कळमेकर अशी पटवत तिचा खून झाल्याच्या आरोपाखाली शिवानीच्या वडील आणि भावाला अटक करण्यात आली होती. महिनाभरानंतर शिवानी जिवंत असल्याचे समोर आले, ती स्वतः पोलिसांसमोर हजर झाली. वडील आणि भावाला सोडण्याची विनंती केली.. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली.. तपासात हलगर्जी झाल्याचा ठपका ठेवत एसपी श्री निलेश तांबे यांनी एलसीबी प्रमुख, एलसीबी तपास पथक आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशा ६ जणांचा पदभार काढून नियंत्रण कक्षात रवानगी केली. आता या गंभीर प्रकरणाचा तपास मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्याकडे सोपवण्यात आलाय.. जो मृतदेह सापडलेला होता, तो अर्धवट जळालेल्या अवस्थेतील होता, धड आणि शीर वेगवेगळे होते.. त्यामुळे "ती" कोण याची ओळख पटवणे अवघड जाते आहे. जोपर्यंत "ती" कोण? हे समोर येत नाही तोपर्यंत मारेकरी सापडणार नाहीत..त्यामुळे पोलिसांना आधी तिची ओळख पटवावी लागणार आहे.. दोन वर्षाआधी बुलढाणा जिल्ह्यात अशाच दोन घटना घडल्या होत्या.. घटना वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत घडल्या होत्या.. दोन्हीही घटनांत महिलांचा खून करून मृतदेह अर्धवट जाळण्यात आला होता, मात्र अद्याप या दोन्ही घटनांचा तपास लागलेला नाही.. अंढेरा आणि किनगाव राजा पोलिस तसेच स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास लावण्यात सपशेल अपयशी ठरली आहे.. राजुरा घटनेच्या निमित्ताने पुन्हा या प्रकरणांना उजाळा मिळाला असून ज्या पद्धतीने राजुरा प्रकरणाचा तपास एसडीपीओ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला तसाच "त्या" दोन्ही घटनांचाही सोपवण्यात यावा अशी चर्चा समोर येत आहे.

२२ जानेवारी२०२४ रोजी एसपी सुनील कडासने यांच्या कार्यकाळात अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत असोला शिवारात अंदाजे २० ते २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. मृतदेह नग्नावस्थेत होता, डोक्यावर मार होता..आधी लैंगिक अत्याचार, नंतर डोक्यात दगड घालून खून आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळणे असा तो प्रकार होता. या प्रकरणाच्या तपासासाठी आधी ओळख पटवणे आवश्यक होते. अंढेरा पोलिसांनी बेपत्ता असलेल्या जवळपास २००० हजार मुलींची तपासणी करूनही ओळख पटू शकली नव्हती..आता या घटनेला जवळपास अडीच वर्षे होत आली तरी ती कोण? तिचे खुनी कोण? हे समोर आलेले नाही..! या घटनेच्या ४ महिन्यानंतर किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत अशीच "सेम–घटना" उघडकीस आली होती.
तारीख ३० मे २०२४ रोजी किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत सिंदखेडराजा मेहकर रस्त्यावरील पिंपळगाव लेंडी शिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला. महिलेचे वय अंदाजे २० ते २५ वर्षे असावे.. महिलेचा चेहरा पूर्णपणे जाळण्यात आला होता.शिवाय डाव्या पायाची बोटे देखील तोडण्याचा प्रयत्न झाला होता.. महिलेच्या डाव्या पायाला ६ बोटे असल्याने ती ओळख स्पष्ट होऊ नये म्हणून मारेकर्‍यांनी तसे केले होते. या घटनेनंतर देखील किनगाव राजा आणि एलसीबीने ओळख पटवण्याचा प्रयत्न केला..मात्र ओळख पटली नाही.. त्या घटनेला दोन वर्षे होऊनही प्रकरण जैसे थे आहे.. आता जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरा शिवारात घडलेला प्रकारही असाच आहे.. तिन्ही घटनांमध्ये मृतदेह जाळून ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे.. अंढेरा आणि किनगाव राजाचा तपास अद्याप लागला नाही..आता राजुरा मर्डर प्रकरण पोलिस कसे हाताळतात? हे पहावे लागेल..