सात जणी बसल्या उपोषणाला, आठ दिवस झाले पण त्‍यांचे डोळे न्‍यायाकडेच!; चौघींची प्रकृती बिघडली

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बाभूळखेड (ता. मेहकर) येथील सात महिला घरकुलाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ जुलैपासून उपोषणाला बसल्या असून, आज २ ऑगस्टला त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. मात्र अद्याप ना अधिकाऱ्यांनी त्यांची गांभीर्याने दखल घेतली ना कुणा राजकीय नेत्याला त्यांची दखल घ्यावीशी वाटली. यातील सातपैकी चौघींची प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी घरी नेले. मात्र …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बाभूळखेड (ता. मेहकर) येथील सात महिला घरकुलाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ जुलैपासून उपोषणाला बसल्या असून, आज २ ऑगस्‍टला त्‍यांच्‍या उपोषणाचा आठवा दिवस आहे. मात्र अद्याप ना अधिकाऱ्यांनी त्‍यांची गांभीर्याने दखल घेतली ना कुणा राजकीय नेत्‍याला त्‍यांची दखल घ्यावीशी वाटली. यातील सातपैकी चौघींची प्रकृती बिघडल्‍याने त्‍यांना त्‍यांच्‍या कुटुंबियांनी घरी नेले. मात्र तिघी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आंदोलन सोडण्याच्‍या मूडमध्ये नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्‍या ठाण मांडून आहेत.

उपोषणाला बसलेल्या महिला भूमिहीन व दारिद्र्यरेषेखालील आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत धनदांडग्या लोकांना घरकुल दिले. गावातील नोकरदार व जमीनदार लोकांची घरे सिमेंट काँक्रिटची असूनसुद्धा, त्याची नावे घरकुलाच्या यादीत असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. गावातील गरजू आणि पात्र लोकांना घरकुल मिळण्याबद्दल योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत जीव गेला तरी उपोषण थांबवणार नाही, असे महिलांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, आंदोलन करणाऱ्या राजकीय पक्षांची त्वरित दखल घेतली जाते मात्र या गरीब महिलांचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.