संकटमोचकांच्या जयंतीला रेकॉर्डब्रेक 1327 पॉझिटिव्ह! घाटावर कोविडचे थैमान!! घाटाखालीही धुमाकूळ

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कोरोनाच्या सावटाखाली साजऱ्या होणाऱ्या संकट मोचक हनुमानाच्या जयंतीदिनी जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक 1327 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. घाटावरील सर्वच तालुक्यांत तर घाटाखालील संग्रामपूर वगळता सर्व तालुक्यांतील कोविडचा प्रकोप कायम असल्याचे धक्कादायक चित्र आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा हादरल्याचे दिसून येत आहे. कागदोपत्री कडकडीत निर्बंध असताना एप्रिल महिन्यातील 27 तारखेला रेकॉर्डब्रेक …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः कोरोनाच्या सावटाखाली साजऱ्या होणाऱ्या संकट मोचक हनुमानाच्या जयंतीदिनी जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक 1327 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. घाटावरील सर्वच तालुक्यांत तर घाटाखालील संग्रामपूर वगळता सर्व तालुक्यांतील कोविडचा प्रकोप कायम असल्याचे धक्कादायक चित्र आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा हादरल्याचे दिसून येत आहे.

कागदोपत्री कडकडीत निर्बंध असताना एप्रिल महिन्यातील 27 तारखेला रेकॉर्डब्रेक 1327 रुग्ण आढळले. घाटावरील सर्व तालुके कोरोनाने पादक्रांत करून तेथील पुढारी व यंत्रणांसमोर कठोर आव्हान उभे केले आहे. आघाडीवरील बुलडाणा तालुक्यातील कोरोनाचा हैदोस कमी व्हायचे नाव घेत नाहीये!, गत 24 तासांत तालुक्यात 287 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मेहकर 169, लोणार 102, देऊळगाव राजा 151, सिंदखेडराजा 91, चिखली 106 या तालुक्यांतील आकडे हादरविणारे आहेत. घाटाखालचा संग्रामपूर (3 रुग्ण) हा चमत्कारिक तालुका सोडला तर घाटाखालील तालुके मागे आहे असे नाहीच, फक्त तेथील आकडे थोडे कमी आहे एवढेच! खामगाव 99, शेगाव 51, मलकापूर 70, नांदुरा 80, मोताळा 64, जळगाव जामोद 54, अशी ही आकडेवारी आहे.

9 जण दगावले

दरम्यान, या थैमानात मृत्यूचे तांडव कायम आहे. गत 24 तासांत 9 रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. बुलडाणामधील महिला रुग्णालयात 7 जणांचे मृत्यू धक्कादायक बाब ठरावी. शेगाव सामान्य रुग्णालय व सिंदखेड राजामधील जिजाऊ रुग्‍णालयातील प्रत्येकी एका रुग्णाने उपचारादरम्यान शेवटचा श्वास घेतला.