शिवजयंतीला सार्वजनिक सोहळ्यासह मिरवणुकीस मज्जाव! अभिवादनास 100 मावळ्यांनाच हजेरीची मुभा!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः छत्रपती शिवरायांचे आजोळ असलेल्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात शिवजयंती उत्सव जंगी जाहीर कार्यक्रम, मिरवणुका यासह वेगळ्याच उत्साहात साजरा करण्यात येतो, मात्र यावेळी जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मावळ्यांनी धुमधडाक्यात जयंती साजरी करण्याचे नियोजन केले असेल तर त्यांना आपले नियोजन रद्द करावे लागणार आहे. याचे कारण 2020 पासून पिच्छा करणारा कोरोना नामक खलनायक …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः छत्रपती शिवरायांचे आजोळ असलेल्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात शिवजयंती उत्सव जंगी जाहीर कार्यक्रम, मिरवणुका यासह वेगळ्याच उत्साहात साजरा करण्यात येतो, मात्र यावेळी जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मावळ्यांनी धुमधडाक्यात जयंती साजरी करण्याचे नियोजन केले असेल तर त्यांना आपले नियोजन रद्द करावे लागणार आहे. याचे कारण 2020 पासून पिच्छा करणारा कोरोना नामक खलनायक एका महानायकाच्या जयंती सोहळ्याआड आलाय! यामुळे अत्यंत साधेपणानेच सर्वांना जयंती उत्सव साजरा करावा लागणार आहे.
परिणामी जयंतीला अर्थात 19 फेब्रुवारी रोजी कोणत्याही प्रकारची मिरवणूक, बाईक रॅली, प्रभात फेर्‍या काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच जाहीर सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, पोवाडा- शाहिरी कार्यक्रम, नाटिका नाट्य आदी समारंभ आयोजित करण्यास देखील मज्जाव करण्यात आला आहे. जिल्हावासीयांचे दैवत, अस्मिता असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला मानाचा मुजरा करण्यासाठी आयोजित सोहळ्याला केवळ 100 जण हजर राहू शकतात. त्यातही सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर, मास्क आदींचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जाहीर कार्यक्रम ऐवजी रक्तदान, कोरोना, डेंग्यूवर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आज 12 फेब्रुवारीच्या संध्याकाळी उशिरा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले. याची माहिती पसरताच लाखो शिवप्रेमींचा व जिल्हाभरातील आयोजकांचा प्रचंड हिरमोड झाला आहे.