वाह याला म्‍हणतात गाव… पाणीपुरवठा कर्मचाऱ्याच्‍या अपघाती निधनानंतर कुटुंबाला वर्गणी करून केली 4 लाखांची मदत!!

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे) ः सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी विश्वंभर श्रावण मांजरे यांचा विजेच्या खांबाला चिकटून मृत्यू झाला होता. कर्ता पुरुष गेल्यामुळे मांजरे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. मांजरे गावामध्ये पाणी सोडायचे काम करायचे. त्यामुळे त्यांचा ऋणानुबंध प्रत्येक कुटुंबाशी जुळला होता. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करताना उपसरपंच भगवानराव उगले यांनी गावकऱ्यांना …
 

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे) ः सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी विश्वंभर श्रावण मांजरे यांचा विजेच्या खांबाला चिकटून मृत्यू झाला होता. कर्ता पुरुष गेल्यामुळे मांजरे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. मांजरे गावामध्ये पाणी सोडायचे काम करायचे. त्यामुळे त्यांचा ऋणानुबंध प्रत्येक कुटुंबाशी जुळला होता. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करताना उपसरपंच भगवानराव उगले यांनी गावकऱ्यांना मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी तब्बल चार लाख रुपये जमा करून ती 4  लाखांची रक्कम आज, 21 मार्चला मांजरे यांच्‍या घरी जाऊन कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आली.

विश्वंभर मांजरे 20 वर्षांपासून मलकापूर पांग्रा येथे पाणी सोडण्याचे काम करायचे. उदरनिर्वाहासाठी छोटे-मोठे वीज दुरुस्तीचे कामही करायचे. 16 मार्चला वीज दुरूस्तीचे काम करण्यासाठी ते विद्युत पोलवर गेले असता त्यात वीज प्रवाह उतरून त्यांचा खांबावरच चिटकून मृत्यू झाला. विश्वंभरच्या अपघाती निधनाने गावामध्ये चुली पेटल्या नव्हत्या. आपल्या कुटुंबातीलच एक व्यक्ती गेला अशी भावना प्रत्येक घरामध्ये आहे. उपसरपंच भगवानराव उगले, सरपंचपती बंडू उगले, गुलशेर खासाब माजी सरपंच अहेमद यारखा, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद यारखा, रवी वायाळ, हनीफ बागवान, गोपाल टाले, नामदेव उगले, बबन काकडे, आशिष बियाणी, पोलीस पाटील पांडुरंग सोनवणे, पत्रकार भगवान साळवे, वसीम शेख, फकीरा पठाण, पवन दाभेरे आदींनी गावात फिरून दोन दिवसांमध्ये तब्बल चार लाख रुपये जमा केले. ती जमा झालेली रक्कमपैकी 2लाख रुपये मृतकाचे पत्नी लक्ष्मीबाई यांना दिले तर उर्वरित 2 लाख रुपये मृतकाचे वडील श्रावण मांजरे यांना असे एकूण 4 लाख रुपये त्यांच्या घरी जाऊन मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत सुपूर्द केली. गावकऱ्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल मांजरे यांच्‍या कुटुंबियांचे डोळे भरून आले. उपस्थित गावकऱ्यांचेही डोळे पाणावले.