वाहऽऽ… किन्होळ्यात लोकसहभागातून साकारले जिल्ह्यातील पहिले कोविड आयसोलेशन सेंटर!

जिल्हाधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या हस्ते झाले सेवेत रुजू; रविकांत तुपकरांसह गावकऱ्यांचे केले कौतुक बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांचा सक्रिय पुढाकार व गावकऱ्यांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळे चिखली तालुक्यातील किन्होळा येथे जिल्ह्यातील पहिले कोविड आयसोलेशन सेंटर साकारले आहे! लोकांनी लोकांसाठी लोकसहभागातून उभारलेल्या या केंद्राचे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी …
 

जिल्हाधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या हस्ते झाले सेवेत रुजू;  रविकांत तुपकरांसह गावकऱ्यांचे केले कौतुक

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांचा सक्रिय पुढाकार व गावकऱ्यांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळे चिखली तालुक्यातील किन्होळा येथे जिल्ह्यातील पहिले कोविड आयसोलेशन सेंटर साकारले आहे! लोकांनी लोकांसाठी लोकसहभागातून उभारलेल्या या केंद्राचे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी भरभरून कौतुक करीत किन्होळा पॅटर्न संपूर्ण जिल्हाभर राबविणार असल्याचा मनोदय लोकार्पण प्रसंगी बोलून दाखविला.

आज, ३ मे रोजी प्रतिष्ठित नागरिक प्रभूकाका बाहेकर यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या आयसोलेशन सेंटरचे मुख्य संकल्पक तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, शासकीय कोविड सेंटरचे प्रभारी डॉ. सचिन वासेकर, चिखलीचे ठाणेदार गुलाबराव वाघ, सरपंच अर्चना वसंत जाधव यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी केंद्राची पाहणी करत सुविधा, स्वच्छता आणि व्यवस्थेचे कौतुक केले. पोलीस अधीक्षक श्री. चावरिया यांनी  निटनेटकेपणाची प्रशंसा केली. डॉ. सचिन वासेकर यांनी कोरोनाची भयावहता स्पष्ट केली. किन्होळाप्रमाणे जिल्हाभरातील मोठ्या गावांमध्ये आयसोलेशन सेंटर उभे करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून येथील रुग्णांवर उपचाराची हमीही त्यांनी दिली. यावेळी डॉ.अनिल साळोख, डॉ.अनिल पांढरे, डॉ.आकाश सदावर्ते, डॉ. स्वप्नील अनाळकर, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. भाग्यश्री खेडेकर, डॉ. दिपाली महाजन, उपसरपंच कल्पना राजपूत, पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, राजू बाहेकर, मधुकर बाहेकर, ग्रा.पं. सदस्य शेख आरिफ शेख रज्जाक, ग्रामसेवक रमेश मुंडे , कृषी सहाय्यक विष्णू डुकरे, बंडू बाहेकर उपस्थित होते.

किन्होळावासियांचा प्रचंड प्रतिसाद

गावागावात आयसोलेशन सेंटर उभारून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी नुकतीच जिल्हा प्रशासनाकडे केली होती. किन्होळामध्ये ५ जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले. या गावात तात्काळ आयसोलेशन सेंटर उभारून कोरोनाला आळा घालण्याचा तुपकरांनी निश्चय केला. त्यांनी गावातील ज्येष्ठ आणि तरुणांची भेट घेऊन आपला संकल्प बोलून दाखविला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. गावातील प्रमुखांच्या बैठकीत  लोकवर्गणीतून, लोकसहभागातून कोविड आयसोलेशन सेंटर उभारण्याच्या तुपकरांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी गावकरी सरसावले. अवघ्या एका तासात दीड लाख रुपयांचा लोकनिधी जमा झाला. नंतर नवीन खाटा घेण्यापासून ते औषधोपचारापर्यंत आणि भोजन- पाण्याच्या व्यवस्थेपासून ते शौचालयापर्यंतच्या सूक्ष्म बाबींचे नियोजन करून सर्व गोष्टी साकारण्यात आल्या. प्रा. अरविंद पवार यांनी विविध समित्यांचे गठन करून कामात सुसूत्रता आणली. ५० पेक्षा अधिक तरुण स्वयंसेवक म्हणून समित्यांच्या माध्यमाने सक्रिय झालेत.

दृष्टिक्षेपात किन्होळा पॅटर्न

  • शिवाजी हायस्कूलच्या सुसज्ज इमारतीत ५० बेडची सुविधा
  • पाणी, भोजन, नाश्ता आणि शौचालयाची व्यवस्था
  • महिलांसाठी स्वतंत्र कक्ष.
  • पुरेशी प्रकाश व्यवस्था, फॅन आणि स्वच्छतेचे नियोजन.
  • किन्होळा पीएचसीच्या डॉक्टरांचे पथक कार्यान्वित राहणार.
  • रुग्णांना निशुल्क औषधोपचार.
  • रॅपीड अँटिजन कीटद्वारे कोरोना तपासणीची व्यवस्था.
  • लसीकरण आणि कोरोना टेस्ट बाबत गावात दररोज होणार प्रबोधन.