मोठी बातमी! विधि मंडळाची समिती २८ सप्‍टेंबरपासून जिल्ह्यात!!; विविध योजनांसह बिंदूनामावलीची घेणार झाडाझडती!! जिल्हा प्रशासनासह यंत्रणा हायअलर्टवर

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती जिल्ह्यात २८ सप्टेंबरपासून दाखल होत आहे. ही १६ सदस्यीय समिती जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय विभाग व कार्यालयातील अनुसूचित जाती समितीच्या कल्याणकारी योजना आणि बिंदूनामावली आदींची झाडाझडती घेणार आहे. व्यापक अधिकार असलेल्या या समितीच्या दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासनासह सर्व यंत्रणा “हायअलर्ट मोड’वर गेल्या …
 
मोठी बातमी! विधि मंडळाची समिती २८ सप्‍टेंबरपासून जिल्ह्यात!!; विविध योजनांसह बिंदूनामावलीची घेणार झाडाझडती!! जिल्हा प्रशासनासह यंत्रणा हायअलर्टवर

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती जिल्ह्यात २८ सप्टेंबरपासून दाखल होत आहे. ही १६ सदस्यीय समिती जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय विभाग व कार्यालयातील अनुसूचित जाती समितीच्या कल्याणकारी योजना आणि बिंदूनामावली आदींची झाडाझडती घेणार आहे. व्यापक अधिकार असलेल्या या समितीच्या दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासनासह सर्व यंत्रणा “हायअलर्ट मोड’वर गेल्या असून, कामाला भिडल्याचे दिसून येत आहे.


केवळ माजी केंद्रीय मंत्री तथा दिग्गज काँग्रेस नेते यांच्या कन्या एवढीच ओळख नसलेल्या आणि एक अभ्यासू आमदार, आक्रमक नेत्या म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे या समितीच्या प्रमुख आहेत. याशिवाय समितीत विधानसभा व परिषदेचे विविध पक्षीय आमदार सर्वश्री बालाजी किनीकर, संतोष बांगर, यशवंत माने, किरण लहामटे, लहू कानडे, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाने, टेकचंद सावरकर, नरेंद्र भोंडेकर, अरुण लाड, राजेश राठोड, विजय गिरकर, बाळाराम पाटील, राजू आवळे यांचा समितीत समावेश आहे.

याशिवाय त्यांच्यासमवेत अधिकारी, कर्मचारी, स्वीय सहायक, प्रतिवेदक, आदींचा ताफा राहणार आहे. या १६ सदस्यांसाठी १६ संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यामध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना समितीचे आगमन ते प्रस्थान पर्यंत समिती समवेत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय गंभीर कारवाई करण्याची तंबी देण्यात आली आहे, विधिमंडळाची समिती असल्याने व सर्व सदस्य आमदार असल्याने ही समिती किती “पॉवरफुल’ आहे हे स्पष्ट होते. यामुळे दौरा निश्चित होताच जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी तात्काळ सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यात समितीच्या अनुषंगाने जय्यत पूर्व तयारी करण्याचे आदेश देण्यात आले.
कशाचा घेणार आढावा…
२८ सप्‍टेंबरला ही समिती बुलडाण्यात दाखल होणार असून, लगेच कामाला लागणार आहे. सकाळी ९ ते साडेनऊ दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील खासदार, आमदार, जि. प. अध्यक्ष व सभापती यांच्या समवेत अनुसूचित जातीच्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेणार असून, आढळून येणाऱ्या त्रुटींवर चर्चा करणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात क्रमशः १३ पालिका व नगरपंचायती, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वन, पाटबंधारे, अन्न नागरी पुरवठा, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम, शिक्षणाधिकारी, उत्पादन शुल्क, एसटी महामंडळ, समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.

एससी प्रवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी तथा कल्याणकारी योजनांवर ही चर्चा होणार आहे. यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान शासकीय व अनुदानित शाळा, वसतिगृहे, जि. प., नगरपरिषदांकडून करण्यात आलेल्या योजनांच्या कामांना व बुलडाणा पालिकेच्या दलित वस्ती योजनेच्या कामांची पाहणी करणार आहेत. २९ सप्‍टेंबरला याच अनुषंगाने जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालयाची झाडाझडती घेणार आहे. दुपारी तीननंतर समिती शाळा व वसतिगृहांना भेटी योजनांची पाहणी करणार आहे. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ पासून महावितरणच्या बुलडाणा शहर व ग्रामीण या कार्यालयाचा बिंदूनामावली व कल्याण योजना संदर्भात आढावा घेण्यात येईल. समारोपात संध्याकाळी ४ ते ५ वाजेदरम्यान समिती जिल्हाधिकारी कार्यालयात तीन दिवसीय दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडणार आहे. योजनांच्या भेटी प्रसंगी आढळलेल्या त्रुटींवर करावयाच्या कार्यवाही तसेच उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांचा आढावा घेण्यात येईल.
तीन समित्या राहणार सेवेत…
दरम्यान, या समितीसाठी ३ व्यवस्था समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. यात निवास, भोजन व वाहन समितीचा समावेश आहे. या समित्या जवळपास २४ तास समितीच्या सेवेत व दक्ष राहणार आहेत.