बिले भरल्‍याशिवाय नादुरुस्‍त रोहित्राचा अहवालच देऊ नका… अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्‍यांनी काढला फतवा?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः बिले भरल्याशिवाय ट्रान्सफार्मर नादुरुस्त असल्याचा अहवालच देऊ नये, अशा सूचना महावितरणच्या अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्याचा आरोप करत, या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आज, 20 मे रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की जिल्ह्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः बिले भरल्याशिवाय ट्रान्‍सफार्मर नादुरुस्‍त असल्याचा अहवालच देऊ नये, अशा सूचना महावितरणच्‍या अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्‍यांनी कर्मचाऱ्यांना दिल्याचा आरोप करत, या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आज, 20 मे रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की जिल्ह्यात कृषी, गावठाण आणि पाणीपुरवठा योजनेचे शेकडो ट्रान्सफार्मर नादुरुस्त झालेले आहेत. मात्र विज वितरण कंपनी बिले भरल्याशिवाय ट्रान्सफार्मर दुरूस्ती करून देत नाहीत. एवढेच नव्हे तर ट्रान्सफार्मर नादुरुस्त असल्याचा अहवाल देऊ नये, अशी स्पष्ट सूचना अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्‍यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या असल्याचे वीज वितरण कंपनीमधील कर्मचारी सांगत आहेत. शासनाने 80 टक्‍के वीज बिल वसुली करावी असा आदेश दिलेला आहे. या आदेशात नादुरुस्त ट्रान्सफार्मरचा नादुरुस्त अहवाल बिले भरल्याशिवाय देऊ नये, असा कुठेही उल्लेख नाही. अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता शासनाच्या आदेशाचा विपरीत अर्थ काढून वीज ग्राहकांना वेठीस धरत आहे. कारण नादुरुस्त अहवाल दिल्यानंतर ठराविक कालावधीमध्ये नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर देणे बंधनकारक असल्याने अहवालच देऊ नये, अशा तोंडी सूचना त्यांनी दिलेल्या असल्याचे त्यांचे कर्मचारी सांगत आहे. सद्यःस्थितीत उन्हाळी पिकांच्या लागवडीचा  हंगाम सुरू आहे.

शेतकऱ्यांनी लॉकडाऊन असताना सुद्धा मोला महागाचे बियाणे व रोपे आणून काळ्या पाण्यावरील ठिबक सिंचनाव्दारे कपाशी व मिरचीची लागवड केलेली आहे. त्या पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीत थोडे फार पाणी आहे. परंतु वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. तसेच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील शेतकरी शेतात जाऊन राहत आहे. त्यामुळे त्यांना वीज मिळत नाही. जनावरांना पिण्यासाठी पाणी देता येत नाही. जंगली जनावरे शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांवर  हल्ले करत आहेत. वीज असल्यास शेतात एखादा लाईट लावल्याने जंगली जनावरे जवळ येत नाही. त्यामुळे जंगली जनावरांनी हल्ले केल्यास व त्यात जीवित हानी झाल्यास वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी आ सौ श्वेताताई महाले यांनी पत्रात केली आहे.