ताईंचे 50 तर भाऊंचे 100 खाटांचे कोविड हॉस्पिटल!; रुग्‍णांच्‍या भल्‍याचा असाही राजकीय संघर्ष

चिखली (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली विधानसभा मतदारसंघातील ताई-भाऊंतील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. एरव्ही कार्यकर्त्यांच्या भल्यासाठी लढणारे हे दोन्ही नेते कोरोनाशी लढण्यावर एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या नसत्या तर नवल! पण यातही छुपा राजकीय वर्चस्वाचा अजेंडा दडलेला आहे. मात्र यातून रुग्णहित साधले जात असल्याने तेवढेच रुग्णांचे भले! जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत …
 

चिखली (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली विधानसभा मतदारसंघातील ताई-भाऊंतील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. एरव्‍ही कार्यकर्त्यांच्‍या भल्‍यासाठी लढणारे हे दोन्‍ही नेते कोरोनाशी लढण्यावर एकत्र आल्याने सर्वांच्‍या भुवया उंचावल्या नसत्या तर नवल! पण यातही छुपा राजकीय वर्चस्वाचा अजेंडा दडलेला आहे. मात्र यातून रुग्‍णहित साधले जात असल्याने तेवढेच रुग्‍णांचे भले!

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंताजनक परिस्‍थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्‍या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षश्रेष्ठींनी आमदारांना आपापल्या मतदारसंघात किमान 50 खाटांचे कोविड रुग्‍णालय सुरू करण्याच्‍या सूचना केल्या आहेत. या सूचनेबरहुकूम चिखलीच्‍या आमदार श्वेताताई महाले यांनी तातडीने तशा हालचाली सुरू करून, काल त्‍यासंदर्भात बैठकही घेतली. आता ताई कोविड रुग्‍णालय सुरू करणार म्‍हटल्‍यावर भाऊ तरी कसे मागे राहतील. ताई 50 खाटांचे रुग्‍णालय सुरू करणार म्‍हटल्‍यावर, भाऊंनी 100 खाटांच्‍या रुग्‍णालयाचे नियोजन केले. परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेव्दारा संचालीत 100 खाटांची सुविधा असलेले कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर लवकरच जनतेच्या सवेत दाखल होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी दिली आहे. हे रुग्‍णालय अनुराधानगरमध्ये सुरू होणार असून, त्यात 100  खााटा असतील. यात 10 आय.सी.यू. बेड, 25 ऑक्सिजन बेड, स्वतंत्र रूम्स, जनरल वॉर्ड, मेडीकल शॉप, रुग्णवाहिका, एम.बी.बी.एस, एम.डी. डॉक्‍टर्स या ठिकाणी उपलब्‍ध असतील. लवकरच स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. कर्मयोगी तात्यासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनुराधा मिशन सातत्याने रुग्णसेवा करत असून, आतापर्यंत लाखो रुग्णांना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून निशुल्क सेवा लाभलेली आहे. कोरोना काळात संस्थेने आपली 150 खाटांची भव्य इमारत कोरोना सेंटरसाठी शासनास 1 वर्षापूर्वीच निःशुल्क उपलब्ध केली आहे. संस्थेच्या 7 बसेस लसीकरणासाठी निःशुल्क उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मौनीबाबा संस्थान रोज कोरोना रुग्णांना मोफत जेवण देत आहेत. जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून कोविड हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे.  आता नवे 100 खाटांचे रुग्णालय आठवडाभरात जनसेवेत दाखल होणार आहे. रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष डॉ. विश्वनाथ यादव, विश्वस्त सिध्देश्वर वानेरे यांनी केले आहे. डॉ. मिसाळ, डॉ. गोसावी, डॉ. संजय घुबे, डॉ. अमोल लहाने आदी डॉक्‍टर सेवा देणार असून या संधीचा रुग्‍णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले आहे.