डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार?

मोताळ्याच्या युवकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा येथील डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. खरबडी (ता. मोताळा) येथील मंगेश देवराज जवळकर या युवकाने याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. बीएस्सी ॲग्री प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ही सीईटीच्या मेरिट लिस्टनुसार होत असते. मात्र कोविड 19 च्या प्रकोपामुळे …
 

मोताळ्याच्या युवकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा येथील डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. खरबडी (ता. मोताळा) येथील मंगेश देवराज जवळकर या युवकाने याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

बीएस्सी ॲग्री प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ही सीईटीच्या मेरिट लिस्टनुसार होत असते. मात्र कोविड 19 च्या प्रकोपामुळे विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयावर प्रवेश प्रकियेची जबाबदारी सोपविली होती. याचा गैरफायदा महाविद्यालय प्रशासनाने घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे सीईटीमध्ये कमी गुण आहेत अशा विद्यार्थ्यांचे गुण महाविद्यालयाने प्रसिद्ध केलेल्या यादीत वाढवून दिले आहेत. या प्रक्रियेत जे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र होते त्यांना डावलून ज्यांच्याकडून आर्थिक व्यवहार केला अशा विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आल्याने होतकरू, मेहनती व अभ्यासू विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगेशने निवेदनातून केली आहे.

याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र गोडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्‍यांनी बुलडाणा लाइव्‍हला सांगितले, की संपूर्ण प्रवेश प्रकिया ही विद्यापीठाच्या नियमाने व सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर पारदर्शी पद्धतीने झाली आहे. महाविद्यालय प्रशासन व विद्यापीठाचे प्रतिनिधी यांनी ही निवड प्रक्रिया केली आहे. या प्रकियेत एखाद्याला प्रवेश मिळाला नसेल म्हणून त्याने ही तक्रार केली असावी असे वाटत असल्याचे ते म्हणाले.