जिगावग्रस्तांना दिलासा… नवीन वर्षात 814 कोटींचे करणार वाटप; सरत्या वर्षात दिला 270 कोटींचा मोबदला

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्प असलेल्या जिगावसाठी लागणार्या जमिनीचे भूसंपादन सुरू आहे. सरत्या वर्षात 11 गावांतील प्रकल्पग्रस्तांना तब्बल 270 कोटींच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आले असून, ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच नवीन वर्षात 9 गावांतील रहिवाशांना तब्बल 814 कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्प असलेल्या जिगावसाठी लागणार्‍या जमिनीचे भूसंपादन सुरू आहे. सरत्या वर्षात 11 गावांतील प्रकल्पग्रस्तांना तब्बल 270 कोटींच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आले असून, ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच नवीन वर्षात 9 गावांतील रहिवाशांना तब्बल 814 कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. यामुळे हजारो प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिगाव प्रकल्पासाठी लागणारी जमीन संपादित करण्याचे काम सुरू असून, याला वेग आला आहे. सरत्या वर्षात कोरोना, कर्मचार्‍यांना असलेला धोका, लॉकडाऊन, निधीची कमतरता या एक ना अनेक अडचणींवर मात करून 11 गावांचे अवार्ड पूर्ण करण्यात आले. यामध्ये बेलाड, कोदरखेड, मावली, कालवड, पातोंडा, दादलगाव, दादगाव, येरळी, हिंगणा बाळापूर, मानेगाव, इसापूर या गावांतील गावठाणातील घरांच्या मोबदल्यांचे वाटप करण्यात आले. येरळी येथील 470 घरांसाठी 63, पातोंडा येथील घरांसाठी 32, दादगाव येथील 293 घरांसाठी 42, मानेगाव येथील घरांसाठी 38 कोटी रुपयांच्या वाटपासाठी यंत्रणांना सातत्याने परिश्रम करावे लागले.

याशिवाय 2021 मध्ये बुडीत क्षेत्रातील 9 गावांमधील 2980 हेक्टर आर क्षेत्राच्या शेत जमिनीसाठी तब्बल 814 कोटींचा मोबदला देण्याचे नियोजन आखण्यात आले असल्याचे उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) भूषण अहिरे यांनी सांगितले. यासाठी 420 कोटींचा निधी उपलब्ध असून 393 कोटींची मागणी करण्यात आल्याचे ते म्हणाले. यामध्ये भोटा, मानेगाव, हिंगणा बाळापूर, मावली, कालवड, हिंगणा दादगाव, टाका या गावांचा समावेश आहे. या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे, भिकाजी घुगे यांच्या नियोजनानुसार विजय हिवाळे, जी. के. मोतेकर, अमोल घुसळकर, स्मिता ठिगळे, संजय जोशी, गजानन गोरे, प्रिया डोंगरे, रोहिणी पाटील, श्रीमती ठेंग यांनी अथक परिश्रम घेतले.