खुश खबर!… अखेर रखडलेल्या रेती घाट लिलावांचा मार्ग मोकळा, पहिल्या टप्प्यात 12 घाटांचे इ- लिलाव

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कमी अधिक सव्वा वर्षांपासून रखडलेल्या व जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रावर गंभीर परिणाम करणार्या रेती घाट लिलावांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यामुळे बांधकाम व्यवसायाला पुन्हा उर्जितावस्था मिळणार असून कामांना गती मिळणार आहे. मागील 12 ते 13 महिन्यांपासून रेती घाट लिलाव रखडल्याने विकास कामे व खासगी क्षेत्रातील बांधकामे रखडली. …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कमी अधिक सव्वा वर्षांपासून रखडलेल्या व जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रावर गंभीर परिणाम करणार्‍या रेती घाट लिलावांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यामुळे बांधकाम व्यवसायाला पुन्हा उर्जितावस्था मिळणार असून कामांना गती मिळणार आहे.

मागील 12 ते 13 महिन्यांपासून रेती घाट लिलाव रखडल्याने विकास कामे व खासगी क्षेत्रातील बांधकामे रखडली. यामुळे रेतीचा अवैध उपसा व वाहतुकीला ऊत आला होता. परिणामी रेतीचे भाव गगनाला भिडले असतानाच ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे ठरले. यामुळे बांधकामात रेतीऐवजी खडी चा चुरा वापरण्याची वेळ बांधकाम व्यावसायिकांवर आले. कोट्यवधींची विकास कामे रखडली तर कोटी, अब्जावधींची उलाढाल असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला जबर फटका बसला. या पार्श्‍वभूमीवर उशिरा का होईना आता शासकीय रेती घाटांच्या इ लिलावांचा मार्ग मोकळा झाला. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 12 घाटांचे ऑनलाईन पद्धतीने लिलाव होणार आहेत. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील म्हसला बुद्रूक, सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा, तढेगाव, साठेगाव, जळगाव जामोद तालुक्यातील माणेगाव, दादुलगाव, हिंगणा बाळापूर, गोळेगाव बुर्द व खुर्द, झाडेगाव, भेंडवळ बुद्रुक व संग्रामपूर तालुक्यामधील पेसोडा या घाटांचा समावेश आहे. या घाटामध्ये अंदाजे 37 हजार 958 ब्रास रेती साठा आहे. याची पूर्व निर्धारित किंमत (अपसेट प्राईज) 4 कोटी 84 लाख 34 हजार 408 रुपये इतकी आहे. यामुळे शासनाला सुमारे 5 कोटींचा महसूल मिळणार आहे.

इ लिलावाचे नियोजन…

दरम्यान, प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड व त्यांचे सहकारी संजय वानखेडे, राजेंद्र एंडोले, प्रशांत रिंढे यांनी किचकट नियम व निर्देशांचे पालन करत इ लिलावाचे नियोजन केले. 5 जानेवारीला दुपारी इ लिलावांचा प्रशिक्षण वर्ग असणार असून संगणकीय नोंदणीला सुरुवात होईल. 12 तारखेला सायंकाळी 5 वाजता नोंदणी बंद होणार असून 13 तारखेपासून इ निविदा ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे. 21 ला सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान इ लिलाव पार पडणार आहेत. यानंतर इ निविदा डाउनलोड करून उघडण्यात येतील, अशी माहिती डॉ. राठोड यांनी बुलडाणा लाइव्हला दिली.