“काळ आला होता, पण…’ सुदैवाने इमारतीचा भाग कोसळण्याआधी ते थबकले, अन्यथा…!, चिखली शहरातील घटना; देऊळगाव घुबे येथेही भिंत कोसळून वृद्ध ठार

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शंभर-दीडशे वर्षांपूर्वीची जीर्ण इमारत… कधीही कोसळण्याची स्थिती… स्थानिकांनी नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी करून इमारत पाडून टाकण्यासाठी केलेल्या विनंत्या.. पण नगरपरिषदेचा तरीही भोंगळ कारभार… आज, २२ जुलैला सकाळी ११ च्या सुमारास हाच भोंगळ कारभार अनेकांच्या जीवावर बेतला असता. जीर्ण इमारतीच्या भिंतीचा भलामोठा भाग रस्त्यावर कोसळला. आधी माती पडत असल्याने रहिवाशांना असलेल्या पुर्वानुभवामुळे …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शंभर-दीडशे वर्षांपूर्वीची जीर्ण इमारत… कधीही कोसळण्याची स्‍थिती… स्‍थानिकांनी नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी करून इमारत पाडून टाकण्यासाठी केलेल्या विनंत्‍या.. पण नगरपरिषदेचा तरीही भोंगळ कारभार… आज, २२ जुलैला सकाळी ११ च्‍या सुमारास हाच भोंगळ कारभार अनेकांच्‍या जीवावर बेतला असता. जीर्ण इमारतीच्‍या भिंतीचा भलामोठा भाग रस्‍त्‍यावर कोसळला. आधी माती पडत असल्याने रहिवाशांना असलेल्‍या पुर्वानुभवामुळे त्‍यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबवले होते. अन्यथा अनेक जण या मलब्याखाली दबले गेले असते. नगरपरिषद कुणाचा जीव जाण्याची वाट पाहतेय का, असा संतप्‍त सवाल नागरिकांनी केला आहे.

दोन मजली ही जीर्ण इमारत रेणुका देवी मंदिर मार्ग व रोकडा हनुमान मंदिराच्‍या रोडवर कोपऱ्यावर आहे. ओमप्रकाश पांडे आणि त्‍यांच्‍या भावंडांची मालकीची ही इमारत असून, काही वर्षांपासून संपतलाल सुराणा यांच्‍या ताब्‍यात आहे. माती व दगडांच्‍या मोठ्या फाडींनी बांधलेली ही दुमजली इमारत आता कधीही कोसळण्याच्‍या मार्गावर आहे. या इमारतीजवळच सार्वजनिक नळ, दूध डेअरी आहे. पहाटे पाचपासून रात्री ११ पर्यंत या ठिकाणी वर्दळ असते. पण या वर्दळीचा ही इमारत कधी कर्दनकाळ ठरेल सांगता येत नाही. दहा वर्षांपूर्वी याच इमारतीचा पश्चिमेकडील भाग काही नागरिकांवर कोसळला होता. आताही कायम इमारतीची माती रस्‍त्‍यावर पडत असते. आज सकाळी ११ च्‍या सुमारास माती रस्‍त्‍यावर येत असताना रहिवाशी अलर्ट झाले. त्‍यांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना थांबवले.

तितक्‍यात भिंतीचा भलामोठा भाग रस्‍त्‍यावर कोसळला. दगडे, मातींचा ढिगच रस्‍त्‍यावर झाला. सतर्कता दाखवली गेली नसती तर अनेक जण या मलब्‍याखाली दबले गेले असते. या भिंतीवर ताडपत्री टाकून ठेवल्यामुळे पडणारा भागही दिसत नाही. त्‍यामुळे धोका आणखीनच वाढतो. गेल्या १० वर्षांपासून स्‍थानिक रहिवाशी जीव मुठीत घेऊन जगत असून, नगर परिषदेकडे ही इमारत पाडण्यासाठी निवेदने देत आहेत. एखाद्या जीव जाईपर्यंत नगरपरिषद दखल घेणार नाही का, असा सवाल रहिवाशांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी या भागातील गजानन गिरी, अक्षय डोईफोडे, राज भुजबळ, सौ. राजेश्री खंडेवाल, उमेश खंडेलवाल, अशोक सराफ, राजेश पांडे, वंशिका लोणकर यांच्‍यासह अन्य रहिवाशांनी नगरपरिषदेला निवेदन दिले होते. मात्र अद्याप दखल घेतली गेली नाही, अशी खंत रहिवाशांनी व्यक्‍त केली आहे.

पावसाने भिंत कोसळून वृद्धाचा मृत्यू; चिखली तालुक्यातील घटना
संततधार पावसाने जीर्ण झालेली भिंत कोसळली. यात ७२ वर्षीय वृद्धाचा दबून मृत्यू झाला. ही घटना आज, २२ जुलैला सकाळी देऊळगाव घुबे (ता. चिखली) येथे समोर आली. विठोबा कचरू जाधव (रा. देऊळगाव घुबे) असे वृद्धाचे नाव आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चिखली तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यातच पावसाने देऊळगाव घुबे येथील विठोबा जाधव यांच्या घराची मातीची भिंत जीर्ण झाली. २१ जुलैच्या रात्री भिंत कोसळल्याने विठोबा कचरू जाधव हे भिंतीखाली दबले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.