ऑक्‍सिजन न मिळाल्यामुळे चक्‍कर आली, जबर मार लागून शहीद झाले जवान कैलास पवार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः युनिट 10 महार रेजिमेंटचे शिपाई कैलास भरत पवार हे द्रास सेक्टर भारत- चीन नियंत्रण रेषेजवळ पोस्ट 5240 येथे कार्यरत होते. या पोस्टची उंची 17 हजार 292 फूट आहे. मात्र 31 जुलै 2021 रोजी दुपारी 3.55 वाजता सुटीकरिता पोस्टवरून लिंकसोबत परत येत असताना अचानक मध्येच ऑक्सिजन न मिळाल्यामुळे चक्कर येऊन ते …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः युनिट 10 महार रेजिमेंटचे शिपाई कैलास भरत पवार हे द्रास सेक्टर भारत- चीन नियंत्रण रेषेजवळ पोस्ट 5240 येथे कार्यरत होते. या पोस्टची उंची 17 हजार 292 फूट आहे. मात्र 31 जुलै 2021 रोजी दुपारी 3.55 वाजता सुटीकरिता पोस्टवरून लिंकसोबत परत येत असताना अचानक मध्येच ऑक्सिजन न मिळाल्यामुळे चक्कर येऊन ते पडले. त्यांना जबर मार लागल्यामुळे गतप्राण होऊन शहीद झाले. द्रास सेक्टर जगात अति कमी तापमान असलेले ठिकाण असून, येथे वजा 10 ते 20 डिग्री सें. तापमान असते. तसेच ऑक्सिजनचे प्रमाणही कमी असल्यामुळे ऑक्सिजनअभावी मृत्यूच्या घटना घडतात.

शहीद जवान कैलास पवार यांचे पार्थिव 2 ऑगस्ट 2021 रोजी लेह येथून दिल्ली येथे तर 3 ऑगस्ट रोजी दिल्ली येथून मुंबई, मुंबई येथून औरंगाबाद येथे दुपारी 12.30 वाजता विमानाने आणण्यात आले. एअर फोर्स स्टेशन औरंगाबाद येथे स्टेशन कमांडर, जिल्हाधिकारी व अतिरिक्त आयुक्त यांनी शहीदाच्या पार्थिवास मानवंदना दिली. नंतर पार्थिव शरीर मिल्ट्री हॉस्पीटल, औरंगाबाद येथे ठेवण्यात आले. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजता शहीद जवानाचे पार्थिव शरीर औरंगाबाद येथून जवानाचे राहते घर गजानन नगर, चिखलीकडे रवाना होणार आहे. चिखली येथे 4 ऑगस्ट रोजी शहीद जवान कैलास पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, असे सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी कळविले आहे.