उरलेसुरलेही “पाण्यात’! मेहकर, लोणार तालुक्यात ढगफुटी!!; जिल्ह्यातील १९ मंडळांत अतिवृष्टी, ‘पेनटाकळी’चे ७ दरवाजे उघडले

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गुलाबी चक्रीवादळाच्या तडाख्यातून शेतकरी अजूनही सावरला नसताना काल, १६ ऑक्टोबरच्या रात्री जिल्हाभर पावसाने धुमाकूळ घातला. यंदा सर्वाधिक पावसाचे प्रमाण असलेल्या मेहकर, लोणार तालुक्यात रात्री पुन्हा ढगफुटी झाली. मेहकर तालुक्यातील ८ आणि लोणार तालुक्यातील ४ मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १९ मंडळांत अतिवृष्टी झाली. एकाच रात्रीत एवढ्या मोठ्या …
 
उरलेसुरलेही “पाण्यात’! मेहकर, लोणार तालुक्यात ढगफुटी!!; जिल्ह्यातील १९ मंडळांत अतिवृष्टी, ‘पेनटाकळी’चे ७ दरवाजे उघडले

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गुलाबी चक्रीवादळाच्या तडाख्यातून शेतकरी अजूनही सावरला नसताना काल, १६ ऑक्टोबरच्या रात्री जिल्हाभर पावसाने धुमाकूळ घातला. यंदा सर्वाधिक पावसाचे प्रमाण असलेल्या मेहकर, लोणार तालुक्यात रात्री पुन्हा ढगफुटी झाली. मेहकर तालुक्यातील ८ आणि लोणार तालुक्यातील ४ मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १९ मंडळांत अतिवृष्टी झाली. एकाच रात्रीत एवढ्या मोठ्या संख्येत अतिवृष्टी होण्याची यंदाची ही पहिलीच वेळ आहे. याआधी २७ सप्टेंबरच्या रात्री ९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती.

सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात गुलाबी चक्रीवादळाने झालेल्या पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच ऐन सोयाबीन सोंगण्याच्‍या हंगामात पुन्हा पाऊस कोसळत असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोंगलेले सोयाबीन पाण्यात गेले तर काही ठिकाणी शेतातील सोयाबीन पाण्याखाली गेल्याने सोंगणी लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे उरले सुरले पीकही आता पाण्यात गेल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १६, १७, १८ ऑक्‍टोबरला रोजी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती.

बुलडाणा लाइव्हच्या वृत्तामुळे शेतकरी सतर्कही झाले होते. मात्र अंदाजापेक्षा रात्री झालेला पाऊस जास्तच होता. आज १७ सप्टेंबर आणि उद्या १८ सप्टेंबर रोजीही पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. काल रात्री मेहकर तालुक्यातील मेहकर, जानेफळ, हिवरा, डोणगाव, देऊळगाव माळी, वरवंड, लोणी, अंजनी, लोणार तालुक्यातील बिबी, सुलतानपूर, हिरडव, अंजनी खुर्द या मंडळांत अतिवृष्टी झाली. चिखली तालुक्यातील उंद्री, हातणी, बुलडाणा तालुक्यातील साखळी, देऊळघाट या मंडळांतसुद्धा जोरदार अतिवृष्टी झाली. बुलडाणा तालुक्यात झालेल्या पावसाने पैनगंगा नदी पुन्हा दुथडी भरून वाहत आहे.

८ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस
पावसाळ्याच्या सुरुवातीला रुसलेला पाऊस सप्टेंबर महिन्यात धो धो कोसळला. यंदा जिल्ह्यातल्या १३ पैकी ८ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला. मेहकर तालुक्यात सर्वाधिक १४८ टक्के, लोणार-१२७ टक्के, सिंदखेड राजा १२७ टक्के, बुलडाणा -१२१ टक्के, देऊळगाव राजा ११७ टक्के, खामगाव १११ टक्के, चिखली ११० टक्के, मोताळा १०३ टक्के, संग्रामपूर ९७ टक्के, नांदुरा ९४ टक्के, मलकापूर ९३ टक्के, शेगाव ९० टक्के तर जळगाव जामोद तालुक्यात ८४ टक्के पाऊस झाला.

पेनटाकळी धरणाचे ७ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मेहकर तालुक्यात रात्रीपासून पावसाने धुमाकूळ घातला. पेनटाकळी धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता धरणाचे ७ दरवाजे २५ सें.मी. ने उघडण्यात आले आहे. सध्या नदीपात्रात १८४.७३ क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे. धरणात होणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी अधिक करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असा इशारा पेनटाकळी प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे.

काल रात्री असा झाला पाऊस ( मिलीमीटरमध्ये)
लोणार -८४.८
मेहकर-८४.६
बुलडाणा -५८.२
चिखली -४९.९
देऊळगाव राजा-३९.१
सिंदखेड राजा ५३.८
खामगाव -४५.६
शेगाव – ४६.५
मलकापूर – ३९.८
नांदुरा- ४४.१
मोताळा – २५.२
संग्रामपूर – ४२.२
जळगाव जामोद ४३.६