अनेक विकासकामांना आघाडी सरकारची स्थगिती; मंत्री ठाकूर यांना आमदार श्‍वेताताई महाले यांनी दिले निवेदन

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सन 2018-19 व 2019 -20 या आर्थिक वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारने मूलभूत सुविधा 2515 व इतर कोट्यवधी रुपयांचा निधी प्रत्येक मतदारसंघात दिला. परंतु आघाडी सरकारने त्या सर्व कामांना स्थगिती देऊन विकास खुंटवला असल्याने कामावर दिलेली स्थगिती तात्काळ उठविण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी महिला व बाल कल्याण विकास मंत्री …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः  सन 2018-19 व 2019 -20 या आर्थिक वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारने मूलभूत सुविधा 2515 व इतर कोट्यवधी रुपयांचा निधी प्रत्येक मतदारसंघात दिला. परंतु आघाडी सरकारने त्या सर्व कामांना स्थगिती देऊन विकास खुंटवला असल्याने कामावर दिलेली स्थगिती तात्काळ उठविण्याची मागणी आमदार सौ. श्‍वेताताई महाले यांनी महिला व बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे लेखी पत्र देऊन केली आहे.
23 जानेवारीला यशोमती ठाकूर या चिखली येथे शासकीय दौर्‍यानिमित्त आल्या होत्या. त्यांनी दलीतमित्र स्व. पंढरीनाथ पाटील यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी आमदार सौ. श्‍वेताताई महाले यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की सन 2018 -19 व 2019 – 20 या आर्थिक वर्षात मूलभूत सुविधा 2515, 1238 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत व इतर अनेक शासकीय योजनेमधून विविध तालुक्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे मंजूर झालेली आहेत. अनेक कामांचे कार्यारंभ आदेश दिलेले आहेत तर काही कामांचे आदेश देणे बाकी तर काही कामांची निविदा प्रक्रिया करणे बाकी असताना सरकारने सर्वच कामांना स्थिगिती दिल्याने कोट्यवधी रुपयांची विकास कामे ठप्प पडलेली आहेत. बर्‍याच कामांवर अंदाजपत्रके, निविदा आणि इतर सर्व कागदोपत्री कामे पूर्ण झालेली असून त्यावर शासनाचा बराच निधी खर्च ही झालेला आहे. यशोमती ठाकूर या विदर्भातील सरकारचे प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच त्या बुलडाणा जिल्ह्याच्या संपर्क मंत्री या नात्याने बुलडाणा जिल्हा आणि विदर्भातील विकास कामासाठी आलेला निधी परत जात असल्यास तो विदर्भावर आणि बुलडाणा जिल्ह्यावर अन्याय असून आपण तो दूर करावा, असे ही पत्रात नमूद केले आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष पंडित देशमुख, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनिस शेख बुढण, गटनेते प्रा.राजू गवई गटनेते, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, तालुका उपाध्यक्ष अनमोल ढोरे, बद्री पानगोळे, स्वीय सहायक सुरेश इंगळे, रमेश आकाळ आदी उपस्थित होते.