अडीच तास रोखला महामार्ग!; दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा!!; चिखलीत ‘स्वाभिमानी’चे आंदोलन पेटले

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याच्या व सक्तीची वीजवसुली तात्काळ थांबवावी या मागणीवरून आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज, 19 मार्चला सकाळी नागपूर- औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. तब्बल अडीच तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन दुतर्फा वाहनांच्या दीर्घ रांगा लागल्या. चिखली तालुक्यातील पेठ …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याच्या व सक्तीची वीजवसुली तात्काळ थांबवावी या मागणीवरून आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज, 19 मार्चला सकाळी नागपूर- औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. तब्बल अडीच तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन दुतर्फा वाहनांच्या दीर्घ रांगा लागल्या.


चिखली तालुक्यातील पेठ येथे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला. या महामार्गावरील वाहतुकीने गती घेतली नाही तोच सकाळी 9ः30 वाजताच्या आसपास स्वाभिमानीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रस्ता व्यापत महामार्गावर ठिय्या मांडला. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या दीर्घ रांगा लागल्या. यावेळी देण्यात येणाऱ्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमला आणि दूरवरची वाहने जागीच थबकली! यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी राज्य शासनावर कडाडून हल्ला चढवला. उपमुख्यमंत्री सांगतात वीज कनेक्शन कापणे बंद करा, ऊर्जामंत्री सांगतात कापा, महावितरण बड्या धेंडांना सोडून गोरगरीब शेतकऱ्यांची वीज कापतात, हा सारा प्रकारच विचित्र व चीड आणणारा आहे. यापुढे हे चाळे थांबविले नाही तर आता थेट मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांचा वीज पुरवठा खंडित करणार, असा इशारा तुपकरांनी यावेळी दिला. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. पेठे येथील आंदोलनात श्री. तुपकर यांच्‍यासह भगवानराव मोरे, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, रविराज टाले, अनिल चौहान, सुधाकर तायडे, संतोष शेळके, छोटू झगरे, अविनाश झगरे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. डोणगाव, मेहकर, मोताळा, बुलडाणा, अंचरवाडी फाटा, अंबाशी फाटा (ता. चिखली) येथेही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.