महामार्गाच्‍या कामाच्‍या दोषांवर खासदारांनी ठेवले बोट!; म्‍हणाले, वेळीच दुरुस्‍त करा अन्यथा अपघात वाढतील!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये जंक्शन मिळवताना त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. तसेच रस्त्याची लेव्हल मेंटेन करताना अडचणी आलेल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. महामार्गाचे काम सुरू असतानाच ब्लॅक स्पॉट शोधून आताच त्यात दुरुस्ती करून घेण्यात यावी, अशी सूचना केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी केली. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये जंक्शन मिळवताना त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. तसेच रस्त्याची लेव्हल मेंटेन करताना अडचणी आलेल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. महामार्गाचे काम सुरू असतानाच ब्लॅक स्पॉट शोधून आताच त्यात दुरुस्ती करून घेण्यात यावी, अशी सूचना केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात रस्ता सुरक्षा समितीची बैठक काल, १६ जुलैला घेण्यात आली. त्यावेळी आढावा घेताना खासदार बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, बुलडाणा बाजार समिती सभापती जालिंधर बुधवत, जि. प. सभापती राजेंद्र पळसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे आदी उपस्थित होते.

मराठवाड्यातून येणाऱ्या व शेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेहकर – जानेफळ दरम्यान अपघाती वळण असल्याचे सांगत खासदार श्री. जाधव म्हणाले, की हे वळण आताच अपघात मुक्त करण्यात यावे. येथील स्लोप देखील दोषपूर्ण आहेत. सदर स्लोपही व्यवस्थित करावा. तसेच चिखली – मेहकर मार्गावर लव्हाळानजीक पुलावर वाहन आदळते. परिणामी, वाहन पुलाखाली जाऊ शकते. इतका दोष त्या पूल निर्मितीच्या कामांमध्ये झाला आहे. त्याचप्रमाणे अमडापूरवरून साखरखेर्डाकडे जाताना अंडर ब्रिजमधून मोठे वाहन मुख्य रस्त्यावर येऊ शकत नाही. हीच परिस्थिती साखरखेर्डावरून चिखलीकडे येताना मोठी वाहने वळण घेतानाही अडचणी आहेत. त्यामुळे एखादे वेळेस मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, असे आदेश जाधव यांनी दिले. राष्ट्रीय महामार्गामधून शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यात उतरतानाही चुका आहेत. लेवल व्यवस्थित केलेली नाही. यासंबंधी एक समिती नेमून त्याचा अहवाल मागवावा. यात पीडब्ल्यूडी, पोलीस आणि आरटीओ यांचे अधिकारी नेमावेत, असेही निर्देश खासदार प्रतापराव जाधव यांनी दिले. बैठकीत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी माहिती दिली. बैठकीला संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.