सत्‍यमेव जयते पतसंस्‍थेच्‍या कर्मचाऱ्यांची पठाणी वसुली!; महिलेला अश्लील शिविगाळ, मारहाण, पोलिसांत खोट्या तक्रारीची धमकी!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सत्यमेव जयते पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कर्जवसुलीसाठी महिलेला अश्लील शिविगाळ व मारहाण केली. याप्रकरणी महिलेने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पतसंस्थेच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ. मंगला गुलाबराव शेळके (५४, रा. चांडक ले आउट, सुंदरखेड, बुलडाणा) या महिलेने याप्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, सौ. शेळके यांनी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सत्यमेव जयते पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कर्जवसुलीसाठी महिलेला अश्लील शिविगाळ व मारहाण केली. याप्रकरणी महिलेने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पतसंस्थेच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौ. मंगला गुलाबराव शेळके (५४, रा. चांडक ले आउट, सुंदरखेड, बुलडाणा) या महिलेने याप्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, सौ. शेळके यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये सत्यमेव जयते पतसंस्थेकडून ३० हजार रुपये कर्ज घेतले होते. दरमहा ३ हजार रुपयांचा हफ्ता ठरला होता. मात्र लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने त्या नियमित कर्ज भरणा करू शकल्या नाहीत, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. २५ ऑगस्ट रोजी दुपारी सौ. शेळके घरी असताना पतसंस्थेचे कर्मचारी अंकुश शेळके व संगीता साखरे कर्जवसुलीसाठी आले.

कर्ज भरण्याची मागणी केली असता सौ. शेळके यांनी सध्या पैसे नसल्याचे सांगितले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्‍यांना अश्लील शिविगाळ केली. पैसे भरले नाही तर तुझ्या नावाने खोटा रिपोर्ट देऊ, अशी धमकी दिली. पतसंस्थेच्या महिला कर्मचारी संगीता साखरे यांनी लोटपाट व मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. २६ ऑगस्‍टला दिलेल्या तक्रारीवरून सत्यमेव जयते पतसंस्थेचे कर्मचारी अंकुश शेळके व संगीता साखरे (दोन्ही रा. चांडक ले आउट बुलडाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.