शेतकरी दाम्‍पत्‍याच्‍या “मेसेज’ने हादरले बुलडाणा लाइव्ह! “…तर आम्‍ही दोघं नवराबायको आत्‍महत्‍या करू!!’

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिवृष्टीने ९० टक्के पिकांचे नुकसान झालंय… पीक विमा कंपनीकडे तक्रार करूनही अजून कुणीच पहायलाही आलं नाही… पीक विमा मंजूर झाला नाही तर आम्ही आत्महत्या करू, असा गर्भीत इशारा देणारा मेसेज बुलडाणा लाइव्हच्या हेल्पलाइनवर आला आणि अक्षरशः आमची टीमही हादरली.. तातडीने त्या शेतकरी दाम्पत्याशी संपर्क करून त्यांना आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करत …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिवृष्टीने ९० टक्‍के पिकांचे नुकसान झालंय… पीक विमा कंपनीकडे तक्रार करूनही अजून कुणीच पहायलाही आलं नाही… पीक विमा मंजूर झाला नाही तर आम्‍ही आत्‍महत्‍या करू, असा गर्भीत इशारा देणारा मेसेज बुलडाणा लाइव्हच्या हेल्‍पलाइनवर आला आणि अक्षरशः आमची टीमही हादरली.. तातडीने त्‍या शेतकरी दाम्‍पत्‍याशी संपर्क करून त्‍यांना आत्‍महत्‍येच्‍या विचारापासून परावृत्त करत समुपदेशन करण्यात आले. बुलडाणा लाइव्ह नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कटिबद्ध असल्याने बुलडाणा लाइव्हला मेसेज केल्याचे या शेतकरी दाम्‍पत्‍याने सांगितले. दरम्‍यान, बुलडाणा लाइव्हने या शेतकरी दाम्‍पत्‍याचा मेसेज नव्यानेच रूजू झालेल्या तहसीलदार अतुल पाटोळे यांच्‍यापर्यंत पोहोचवला. त्‍यावर ते म्‍हणाले, की तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना वाघ दाम्‍पत्‍याच्‍या शेतीची पाहणी करण्यासाठी पाठवतो. पीक नुकसानीच्या पंचनाम्‍यांचे आदेश यापूर्वीच दिले अाहेत. ज्‍या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नसतील त्‍यांनी अनुचित पाऊल उचलू नये. रितसर तहसील प्रशासनाकडे तक्रार करावी. त्‍यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्‍वाहीसुद्धा श्री. पाटोळे यांनी दिली.

लांजुड (ता. खामगाव) येथील वृद्ध शेतकरी श्रीराम काशीराम वाघ (६०) व त्यांची पत्नी सरस्वतीबाई (५६) दोघांच्या नावाने लांजुड शिवारात साडेपाच एकर शेती आहे. २ मुले, २ सुना, ५ नातवंडे व वृद्ध आई असा १२ जणांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते मुलाबाळांसह शेतीसोबत दुसऱ्यांच्या शेतात मजुरीही करतात. यंदा ६२ हजार रुपये खर्च करून सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली. पेरणीसाठी पैसेही नातेवाइकांकडून हातउसने आणावे लागल्याचे त्यांनी सांगितले. २७, २८ सप्टेंबरला अतिवृष्टी झाल्याने पिकाचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. भरीस भर म्हणून २ ऑक्टोबरला सुद्धा मुसळधार पाऊस झाला. शेतातील सोयाबीनच्या उभ्या झाडांवर कोंब फुटले. पीक विमा भरलेला असल्याने विमा कंपनीकडे ७२ तासांच्या आत तक्रार केली. मात्र अजून कुणीही पंचनामे करण्यासाठी आले नसल्याचे सांगताना शेतकरी श्रीराम वाघ ढसाढसा रडले. मागील वर्षीच्या पिकविम्याचे पैसे मिळाले नाहीत.

नातेवाइकांचे घेतलेले पैसे कसे द्यायचे? आईचे आजारपण, परिवाराचा खर्च करायचा कसा? असा प्रश्न उपस्थित करताना वाघ दाम्‍पत्‍य हतबल झाले होते. पीक विमा कंपनीने पंचनामा केला नाही तर मदत मिळणार नाही. त्यामुळे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याचे ते म्हणाले. सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी त्‍यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना केली. जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांत ६ शेतकऱ्यांनी अतिवृष्टीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. अजूनही शेतकऱ्यांना मदतीचे ठोस आश्वासन न मिळाल्याने शेतकरी खचल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये,शेतकरी जगला पाहिजे असे प्रशासनाला, सरकारला प्रामाणिकपणे वाटत असेल तर शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची आवश्यकता आहे एवढे मात्र नक्की!