रेती वाहतूकदाराकडून ३५ हजार घेताना देऊळगाव राजाचा पोलीस नाईक संजय चवरे रंगेहात पकडला!; सोबत त्याचा वसुली एजंटही गजाआड!!; देऊळगाव महीतील खळबळजनक कारवाई
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कारवाई न करता रेतीचा टिप्पर सोडून दिल्यानंतर “खुश’ करण्यासाठी ५० हजार मागून पहिला टप्पा म्हणून ३५ हजार रुपये स्वीकारणारा देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक संजय देविदास चवरे (४०) बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आज, २१ सप्टेंबरला अलगद अडकला. ही कारवाई देऊळगाव मही (ता. देऊळगाव) येथील पाबळे मोटर्ससमोर करण्यात आली. चवरे याच्यासह त्याचा “वसुली एजंट’ दत्तात्रय उर्फ सोनू भिमराव शिंगणे (३०, रा. देऊळगाव मही) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
रेती वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या नारायणखेड (ता. देऊळगाव) येथील २३ वर्षीय तरुणाने या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तरुणाचा वाळूने भरलेला टिप्पर पोलीस नाईक चवरे याने पकडला होता. मात्र कोणतीही कारवाई न करता टिप्पर सोडूनही दिला होता. त्याचा मोबदला म्हणून त्याने खासगी व्यक्ती दत्तात्रय शिंगणे याच्यामार्फत ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
लाचेचा पहिला टप्पा ३५ हजार रुपये चवरे याने स्वीकारला. त्याचवेळी सापळा रचून बसलेल्या “एसीबी’च्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याच्याकडून ३५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, बुलडाणा “एसीबी’चे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ महादेव चव्हाण, पो.ना. विलास साखरे, पोलीस शिपाई अझरुद्दीन काझी यांनी केली. तपास बुलडाणा एसीबीचे पोलीस निरीक्षक सचिन इंगळे करीत आहेत.
कुणी लाचत मागत असल्यास…
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा. संपर्क क्रमांक ः 07262-242548, टोल फ्री क्रमांक – 1064