महाठग रे… लक्ष्मीपूजा करायची सांगत वृद्धाचे ३ लाख ८० हजारांचे दागिने घेऊन दोन भामटे पसार!; बुलडाणा शहरातील धक्‍कादायक घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जगात फसविणाऱ्यांची कमी नाही, तशीच फसणाऱ्यांचीही कमी नाही… रोज वृत्तपत्रात कशाप्रकारे लोक फसवू शकतात, याच्या घटना छापून येतात… पण रोज वृत्तपत्र वाचणारे आणि अशा घटना नजरेखालून घालणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बुलडाण्यात तब्बल ३ लाख ८० हजार रुपयांनी गंडवले गेले आहेत. लक्ष्मीपूजा करायची सांगत भामट्यांनी त्यांचे दागिने पाचशे रुपयांच्या नोटेत गुंडाळले अन् …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जगात फसविणाऱ्यांची कमी नाही, तशीच फसणाऱ्यांचीही कमी नाही… रोज वृत्तपत्रात कशाप्रकारे लोक फसवू शकतात, याच्या घटना छापून येतात… पण रोज वृत्तपत्र वाचणारे आणि अशा घटना नजरेखालून घालणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बुलडाण्यात तब्‍बल ३ लाख ८० हजार रुपयांनी गंडवले गेले आहेत. लक्ष्मीपूजा करायची सांगत भामट्यांनी त्‍यांचे दागिने पाचशे रुपयांच्‍या नोटेत गुंडाळले अन्‌ गायब झाले… सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्‍या ही बाब लक्षात येईपर्यंत बराच उशिर झाला… बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोन भामट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण पुंजाजी मुठ्ठे (रा. मुठ्ठे ले आउट, बुलडाणा) यांनी काही वर्षांपूर्वी ५ तोळे वजनाचा सोन्याचा गोफ शहरातीलच देऊळघाटकर ज्वेलर्सकडून विकत घेतला होता. तसेच सोन्याच्या तीन अंगठ्या पाथर्डी ज्वेलर्सकडून तीन ते चार महिन्यांपूर्वी विकत घेतल्या होत्या. ते दागिने ते अंगावर घालत. आज, १ ऑक्‍टोबरला सकाळी साडेनऊ ते दहादरम्‍यान मित्राच्‍या मलकापूर रोडवरील संदीप ट्रेडर्स दुकानावर पेपर वाचायला ते नेहमीप्रमाणे गेले होते. या दुकानाच्‍या बाजूला त्यांच्‍या मुलाचा राजपूत क्लिनिक हा दातांचा दवाखाना आहे. या ठिकाणी ते खूर्ची टाकून पेपर वाचत असताना पांढऱ्या स्कुटीवर दोन अनोळखी व्‍यक्‍ती तिथे आले. त्यापैकी एकाने पांढरा शर्ट व निळसर जीन्स घातलेली होती. डोक्यात पांढरी टोपी होती. शरीराने लठ्ठ होता. दुसऱ्या व्‍यक्‍तीने आकाशी शर्ट घातलेला होता. तो मध्यम बांध्याचा होता. दोघे श्री. मुठ्ठे यांच्‍याकडे आले. त्यापैकी एक त्‍यांना म्‍हणाला, की बाबा डॉक्‍टर साहेबांचे पैसे द्यायचे आहेत. त्‍यावर मुठ्ठे यांनी दवाखान्यातील नोकर गायकवाड याला आवाज दिला. त्‍यावर तो व्‍यक्‍ती म्‍हणाला, बाबा आत चला. तुमच्‍याकडेच मला पैसे द्यायचे आहेत. त्‍यामुळे मुठ्ठे हे त्याच्‍यासोबत दवाखान्यात गेले.

त्या व्‍यक्‍तींनी त्‍यांना स्टुलवर बसवले. कॅप घातलेल्या व्‍यक्‍तीने त्याच्‍या खिशातून ५०० रुपयांची नोट काढली व म्हणाला, की लक्ष्मीची पूजा करायची आहे. तुमच्या बोटातील अंगठी काढून नोटवर ठेवा. त्‍यामुळे मुठ्ठे यांनी बोटातील एक अंगठी काढून त्याच्‍याजवळील नोटेवर ठेवली. नंतर त्‍या व्‍यक्‍तीने दोन्‍ही बोटांतील दोन सोन्याच्या अंगठ्या व गळ्यातील सोन्याचा गोफ काढून ५०० रुपयांच्‍या नोटेत ठेवायला सांगितले. मुठ्ठे यांनी तसे केले असता सर्व दागिने गुंडाळून त्याला लाल रबर लावून दागिने डाॅक्‍टरांच्‍या टेबलमधील ड्राॅवरमध्ये ठेवतो, असे तो व्‍यक्‍ती म्‍हणाला. तुम्ही दहा मिनिटे स्टुलवरच बसा. तोपर्यंत लक्ष्मीपूजन होऊन जाते, असे म्हणून त्या दोघांनी मुठ्ठे यांचे दर्शन घेण्याचे नाटक केले व ताबडतोब निघून गेले. नंतर मुठ्ठे यांनी डाॅक्टरांना बोलावून घेतले व सांगितले, की टेबलच्या ड्राॅवरमधील तुमचे ५०० रुपये घ्या व माझे दागिने मला परत करा. त्‍यानंतर दोघांनी टेबलचा ड्राॅवर उघडला तर त्यात काहीच दिसून आले नाही. तेव्‍हा कुठे मुठ्ठे यांना गंडवले गेल्याचे आणि दागिने घेऊन भामटे पसार झाल्याची जाणीव झाली. त्‍यांनी तातडीने शहर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. भामट्यांनी १ लाख ६० हजार रुपयांचा सोन्याचा गोफ, १ लाख ८० हजार रुपयांच्‍या दोन सोन्याच्या अंगठ्या आणि आणखी एक सोन्याची ४० हजार रुपयांची अंगठी असा एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचे दागिने लंपास केले.