पंचनाम्यांतील भीषण वास्‍तव समोर!; ९० हजार हेक्टरवरील पिके नष्ट; २२३ गावांना तडाखा; मेहकर तालुक्यात सर्वाधिक नासाडी

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नवरात्रोत्सवात थोडी उसंत घेतल्यानंतर पुन्हा हजेरी लावणाऱ्या झंझावती पावसाने जिल्ह्यातील तब्बल ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. याचा सर्वाधिक फटका मेहकर तालुक्याला बसला आहे. यामुळे अगोदरच घायकुतीला आलेल्या हजारो शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. दसऱ्याला “सोने’ लुटू दिल्यावर अचानक जिल्ह्यावर पावसाने जोरदार आक्रमण केले! …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नवरात्रोत्सवात थोडी उसंत घेतल्यानंतर पुन्हा हजेरी लावणाऱ्या झंझावती पावसाने जिल्ह्यातील तब्बल ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. याचा सर्वाधिक फटका मेहकर तालुक्याला बसला आहे. यामुळे अगोदरच घायकुतीला आलेल्या हजारो शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

दसऱ्याला “सोने’ लुटू दिल्यावर अचानक जिल्ह्यावर पावसाने जोरदार आक्रमण केले! १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या पावसाचे रौद्ररूप बळीराजाच्या हृदयाचे ठोके वाढविणारे व सोन्यासारख्या उरल्यासुरल्या खरीप पिकांना नष्ट करणारे ठरले. काही तासांतच निसर्गाच्या या झंझावताने जणू काही खरीप हंगामाची ऐसीतैशी करून टाकली. यामुळे जिल्ह्यात नुकसान झाले असले तरी मेहकर, लोणार व सिंदखेड राजा या शेजारी तालुक्यांना जबर तडाखा बसला.

कृषी विभागाने केलेल्या पाहणीवजा पंचनाम्यांच्या अहवालात सोयाबीन, कपाशी आणि तूर या पिकांची भीषण नासाडी स्पष्ट झाली आहे. यानुसार मेहकर तालुक्यातील तब्बल १३० गावांतील ४९ हजार ४११ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. लोणार तालुक्यातील ४७ गावांतील १७ हजार ४७७ हेक्टरवरील तर सिंदखेड राजामधील ४६ गावांतील २२ हजार ५०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. निसर्गाच्या मनमानीमुळे तब्बल २२३ गावांतील ९० हजार हेक्टरवरील पिके, सुड्या अन्‌ हजारो शेतकऱ्यांची हिरवी स्वप्ने एकाचवेळी जमीनदोस्त झाली.