दोन लाख दिले असते तर आमचा मुलगा असा वागला नसता… तीन दिवस ठेवले उपाशी!; चिखलीतील विवाहितेची पोलीस ठाण्यात आपबिती!!
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कार घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणून विवाहितेचा छळ मांडल्याची घटना चिखलीत आज, ७ ऑगस्टला समोर आली आहे. २० वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी पती, सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सौ. निता वैभव वाघमारे (रा. शिवाजी चौक अनुराधा बँकेसमोर, चिखली ह. मु. गांधीनगर चिखली) या विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे, की २७ जुलै २०२० ला बुलडाणा न्यायालयात तिचे लग्न वैभव गणेश वाघमारे याच्यासोबत कोर्ट मॅरेज पद्धतीने झाले आहे. ती पती, सासू सौ. कमल व सासरे गणेश वाघमारे यांच्यासोबत राहते. लग्न झाल्यानंतर काही दिवस तिला चांगले वागविण्यात आले. नंतर घराच्या बाहेर न जाऊ देणे, जेवायला न देणे असा शारीरिक व मानसिक छळ सासरच्यांकडून सुरू झाला.
भाऊ व आईने सासरच्यांना समजावले असता त्यांनी दोन लाख रुपये चारचाकी गाडी घेण्यासाठी द्या. त्यानंतर आम्ही तिला चांगले वागवतो, असे सांगितले. त्यावर तिच्या आई व भावाने तिला चांगले वागवा. आम्ही पैशाची व्यवस्था करतो, असे म्हणून निघून आले. त्यानंतर काही दिवस तिला चांगले वागविण्यात आले. मात्र २२ जुलैला २०२१ रोजी रात्री साडेअकराला पतीने शिविगाळ केली. तुझ्या आईने आजपर्यंत पैसे दिले नाही, असे म्हणून पांघरण्यासाठी अंगावर कपडे दिले नाही. फोन हिसकावून घेतला, दागिने काढून घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी सासू-सासऱ्यांना हा प्रकार सांगितला असता त्यांनीही तुझ्या आईने दोन लाख रुपये दिले असते तर माझा मुलगा असा वागला नसता, असे म्हणून तिलाच चापटबुक्क्यांनी मारहाण केली. दोन- तीन दिवस जेवायला दिले नाही, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.