जिल्ह्यातील १६ मुली, महिलांचा झाला “सोशल’ छळ!; सायबर क्राईमकडे तक्रारी, पोलिसांनी मुली, महिलांसाठी दिलाय “हा’ संदेश!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्याचे युग इंटरनेटचे आहे. अवघे जग छोट्याशा मोबाइलमध्ये सामावले आहे. तंत्रज्ञानाचा जसा फायदा असतो, तसाच गैरफायदा घेणारेही असतात. सध्या सोशल मीडियाची चलती आहे. फेसबुक, व्हॉट्स, इन्स्टाग्राम, व्टिटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्येक जण असतोच. तरुण मंडळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. यातूनच महिला आणि तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न काही जण करतात. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्याचे युग इंटरनेटचे आहे. अवघे जग छोट्याशा मोबाइलमध्ये सामावले आहे. तंत्रज्ञानाचा जसा फायदा असतो, तसाच गैरफायदा घेणारेही असतात. सध्या सोशल मीडियाची चलती आहे. फेसबुक, व्‍हॉट्‌स, इन्‍स्‍टाग्राम, व्‍टिटरसारख्या सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्मवर प्रत्‍येक जण असतोच. तरुण मंडळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. यातूनच महिला आणि तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न काही जण करतात. यातून त्‍यांचा छळ झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या दीड वर्षात जानेवारी २०२० ते जुलै २०२१ दरम्‍यान महिला आणि मुलींचा छळ झाल्याच्या १६ तक्रारी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या आहेत.

मुली, महिला फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर खाते उघडतात. त्यावर स्वतःचे व्यक्तिगत फोटो अपलोड करतात. खात्याच्या सेटिंग गोपनीय न ठेवल्यामुळे अपलोड केलेले फोटो काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक चोरतात व त्या फोटोंचा गैरवापर करतात. महिलांना ब्लॅकमेल करतात. वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे व ती स्वीकारायला लावण्यासाठी दबाव टाकणे, अश्लील मेसेज पाठवणे, व्हॉट्स ॲप नंबर मिळवून अश्लील नग्न व्हिडिओ पाठवणे अशा प्रकारच्या तक्रारी महिला आणि तरुणींनी केल्या आहेत.

तक्रार न करणाऱ्यांची संख्याही जास्त…
पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर आपले नाव उघड होईल. घरच्यांना उगाच हे प्रकरण माहीत होईल. बदनामी होईल या भीतीपोटी अनेक जणी तक्रार द्यायचेच टाळतात. त्यामुळे त्यांचे वारंवार शोषण होते. त्यामुळे तक्रार देण्यास टाळाटाळ करू नये, असे आवाहन जिल्हा सायबर पोलिसांनी केले आहे.

काळजी घ्या
फेसबुक, व्हाॅट्‌स ॲप, इन्स्टाग्राम व इतर सोशल माध्यमांचा वापर करताना महिला, मुलींनी स्वतःचे फोटो प्रोफाइलला ठेवू नये. स्वतःचे खासगी फोटो सार्वजनिक शेअर करू नये. फेसबुकची, व्हाट्स ॲपची प्रोफाइल लॉक करून ठेवावी. ती केवळ तुमच्या मित्रांनाच दिसेल असे सेटिंग करावे. अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत.

विलासकुमार सानप, सहायक पोलीस निरिक्षक, सायबर क्राईम सेल, बुलडाणा