चोराचे क्रौर्यच म्हणावे… आजीबाईची मान पकडून सोन्याची पोत हिसकावून पळ, प्रतिकार करताना आजी पडल्या!, खामगाव तालुक्यातील घटना
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २५ ते ३० वयाच्या तरुणाने मागून येत आजीबाईची मान पकडून गळ्यातील सोन्याची सेवनपीस पोत हिसकावून पळ काढला. ७० वर्षीय आजीबाई दुसऱ्याच्या शेतात निंदणासाठी रस्त्याने एकट्या जात असताना हा प्रकार काल, ६ ऑगस्टला सकाळी आठच्या सुमारास आवार (ता. खामगाव) येथे घडला.
मथुराबाई महादेव जाधव(७०, रा. आवार) यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोतीत सोन्याचे १४ गोल मणी (वजन ५ ग्रॅम, अंदाजे किंमत २५ हजार रुपये) होते. बाळू मानकर यांच्या शेताजवळ चोरटा आला आणि आजीबाईंची पोत हिसकावू लागला. आजींनी प्रतिकार केला मात्र आजीबाई जमिनीवर पडल्या. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सुनील राऊत करत आहेत.