चिमुकलीला घेऊन ऑनलाइन क्लासला बसलेल्या विवाहितेला झूम ॲपवर अश्लील मेसेज!; शेगाव शहरातील प्रकार
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पहिल्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीला घेऊन झूम ॲपवर ऑनलाइन क्लासला बसलेल्या विवाहितेला अश्लील मेसेज पाठविण्यात आल्याचा प्रकार शेगावमध्ये आज, २६ ऑगस्टला समोर आला आहे. सकाळी ११ ते पावणे बाराच्या दरम्यान हा प्रकार घडला. संध्याकाळी विवाहितेने शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून मेसेज करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेतान चौक भागात राहणारी २९ वर्षीय विवाहिता मुलीचा झूम अॅपद्वारे ऑनलाइन क्लास सुरू असताना तिच्याजवळ बसली. त्याचवेळी कुणीतरी अनोळखी व्यक्तीने घाणेरडे मेसेज करायला सुरुवात केली. या मेसेजद्वारे तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. वाईट उद्देशाने तसेच लज्जा निर्माण करणारे मेसेज केल्याने विवाहितेला मानसिक त्रास झाला. तिने पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. तपास पोलीस निरिक्षक अनिल गोपाळ करत आहेत.