ग्रामपंचायत शिपायाची मोटारसायकल नेली चोरून; इसोली येथील घटना
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरासमोरील वाड्यात उभी केलेली मोटारसायकल चोरट्यांनी लांबवली. ही घटना इसोली (ता. चिखली) येथे २४ ऑगस्टला पहाटे पाचच्या सुमारास समोर आली. या प्रकरणी काल, ३ सप्टेंबरला इसोली ग्रामपंचायतीच्या शिपायाने अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोपाल प्रल्हाद मोरे (३१, रा. इसोली) यांनी २०१५ मध्ये गावातीलच रामेश्वर रामदास शेळके यांच्याकडून स्प्लेंडर मोटारसायकल (MH28AH8271) विकत घेतली होती. २३ ऑगस्टला रात्री मोटारसायकल घरासमोरील वाड्यात उभी करून ठेवली होती. २४ ऑगस्टला पहाटे फिरायला उठले असता मोटारसायकल दिसली नाही. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून आली नाही. अखेर काल ५० हजार रुपयांची मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली.