“खडकपूर्णा’चे १९ दरवाजे उघडले; देऊळगाव राजा तालुक्यातील छोटीमोठी धरणे ओव्हर फ्लो!
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि त्याआधीही सतत होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वांत मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा (संत चोखासागर) धरणाचे १९ दरवाजे ०.५० मीटरने आज, २८ सप्टेंबरला पहाटे पाचला उघडण्यात आले आहेत. त्यातून ३७९४०.०७ क्युसेक (१०७३.५ cumec) विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. तसेच तालुक्यातील इतर लहान धरणे सावखेड भोई, पिंपळगाव चिलमखाँ, शिवनी आरमाळ, मेंढगाव ही लहान धरणेसुध्दा ओव्हरफ्लो झाली आहेत. तालुक्यातील सर्व नदी, ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन खडकपूर्णा प्रकल्प पूरनियंत्रण कक्ष अधिकाऱ्यांनी बुलडाणा लाइव्हद्वारे केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन पीक धोक्यात आले आहेत. अनेक शेतांत पाणी साचल्यामुळे सोयाबीनचे मुळे सडत आहेत. उभ्या सोयाबीनच्या शेंगांना नव्याने कोंब फुटत असल्याने पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच सोयाबीनचे दर दिवसागणिक झपाट्याने खाली येत आहेत. विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहेत. यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडलेला आहे. देऊळगाव राजा तालुका हा सीड हब म्हणून ओळखला जातो. तालुक्यात विविध प्रकारचे नवनवीन बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या सक्रीय आहे . मिरची सिड्स, टोमॅटो या सिड्स बियाणे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. सोयाबिन व मिरची या खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले.