आधी दरवाजा बाहेरून लावला अन् मोटारसायकल दिली पेटवून!; शेगाव तालुक्यातील प्रकार
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घराचा दरवाजा बाहेरून लावून घेत मोटारसायकल जाळून टाकल्याची घटना आळसणा (ता. शेगाव) येथे काल, १ सप्टेंबरला रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली. शेगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात माथेफिरुविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सतीश सुभाष लांजूळकर (३०) यांनी आज, २ सप्टेंबरला सकाळी या प्रकरणात तक्रार दिली. आळसणा गावात बजरंग बलीच्या मंदिरासमोर त्यांचे घर आहे. घराच्या ओट्यासमोर काल रात्री त्यांनी सिडी १०० मोटारसायकल (क्र. एमएच २८ एवाय ५०५५) उभी केली होती. रात्री सव्वा अकराला त्यांच्या वडिलांनी त्यांना हाक मारून बाहेर काहीतरी जळत असल्याचे सांगितले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता तो बाहेरून बंद होता. त्यामुळे दुसऱ्या दरवाजातून ते बाहेर आले. ओट्यासमोरील मोटारसायकल कुणीतरी पेटवून दिलेली होती. पाणी टाकून आग विझविण्यात आली. मात्र तोपर्यंत मोटारसायकल पूर्णपणे जळून गेली आहे. यात ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.