अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ९५० कोटींचे नुकसान!; पालकमंत्री म्‍हणाले, प्रशासकीय यंत्रणेने तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गुलाब चक्रीवादळामुळे मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे जिल्ह्यातील खरीप पिके, घरे आदींचे नुकसान झाले. अशा बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. प्रशासकीय यंत्रणांनी अतिवृष्टीने बाधीत झालेल्या आपाद्ग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गुलाब चक्रीवादळामुळे मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे जिल्ह्यातील खरीप पिके, घरे आदींचे नुकसान झाले. अशा बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. प्रशासकीय यंत्रणांनी अतिवृष्टीने बाधीत झालेल्या आपाद्‌ग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज, ४ ऑक्‍टोबरला दिले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 950 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात पूर, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्‍हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

नुकसान झाल्यानंतर देण्यात येणाऱ्या तातडीच्या मदतीचे जलदगतीने वाटप करण्याच्या सूचना करत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, की नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावे. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा. यात शासनाकडून अधिकाधिक मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. त्याचप्रमाणे धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेती खरडून गेली आहे. अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी. यंत्रणांनी समन्वयातून कुणीही आपाद्‌ग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही डॉ. शिंगणे यांनी केली.