अंगावर ट्रक कोसळल्याने ट्रकचालकाचा मृत्यू;नांदुरा तालुक्यातील घटना

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ट्रकचे काम करत असताना दुसऱ्या वाहनाने उभ्या ट्रकला धडक दिली. त्यामुळे ट्रकखाली काम करणाऱ्या चालकाच्या अंगावर ट्रक कोसळला. यात गंभीर जखमी झालेल्या ट्रकचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल, ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ च्या सुमारास नांदुरा- मलकापूर रोडवरील रायगड ढाब्यासमोर नांदुऱ्यापासून काही अंतरावर हा अपघात झाला. शिवपालसिंग सुरतसिंग जधाम (३०) असे अपघातात …
 

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ट्रकचे काम करत असताना दुसऱ्या वाहनाने उभ्या ट्रकला धडक दिली. त्यामुळे ट्रकखाली काम करणाऱ्या चालकाच्या अंगावर ट्रक कोसळला. यात गंभीर जखमी झालेल्या ट्रकचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल, ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ च्या सुमारास नांदुरा- मलकापूर रोडवरील रायगड ढाब्यासमोर नांदुऱ्यापासून काही अंतरावर हा अपघात झाला.

शिवपालसिंग सुरतसिंग जधाम (३०) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव असून, तो मध्यप्रदेशचा होता. ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने टायर जोडण्यासाठी त्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला. जॅक लावून टायर लावत असताना मलकापूरकडून नांदुऱ्याकडे जाणाऱ्या एका वाहनाने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रकला लावलेला जॅक निसटला अन्‌ ट्रक शिवपालच्या अंगावर कोसळला. त्यामुळे शिवपाल गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमी चालकाला नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने जखमीला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान आज, १० सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ट्रकचालक शिवपाल याचा मृत्यू झाला.