वैदुवाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी युवक आक्रमक; शेळगाव आटाेळ ग्रामपंचायतीकडून सिमेंट रस्ता करुन घेण्याचा युवकांचा निर्धार..!

 
शेळगाव आटोळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गावातील वैदुवाडी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अंत्यसंस्कारांसाठी आलेल्या नातेवाईकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागताे. त्यामुळे, गावातील युवक आक्रमक झाले असून आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सिमेंट रस्ता तयार करून घेण्यासाठी आक्रमक भुमिका स्विकारली आहे.  हा रस्ता न केल्यास २ सप्टेंबर राेजी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठाेकण्याचा इशारा युवकांनी दिला आहे. 
गत पाच वर्षांपासून ग्रामपंचायतीकडे कोटी रुपयांचा निधी असूनही अनेक विकासकामे रखडलेली आहेत. मेरा खुर्द जिल्हा परिषदेत सर्वात मोठी ग्रामपंचायत मानल्या जाणाऱ्या शेळगाव आटोळमध्ये ग्रामपंचायतीतील सदस्यांमधील वाद हा विकासाच्या आड आला आहे. हा वाद थेट हायकोर्टापर्यंत पोहोचूनही मार्गी लागलेला नाही. परिणामी, गावातील महत्त्वाची कामे थांबलेली आहेत.


याच पार्श्वभूमीवर गावातील युवकांनी आता पुढाकार घेत समस्यांकडे ग्रामपंचायतीचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावातील करण यंगड, शक्ती शिंदे, अशोक खर्डे, संघर्ष बोर्डे, संकेत बोर्डे, शुभम हिवाळे, विठ्ठल मिसाळ, पवन अंभोरे, मयूर वाघमारे, आदित्य इंगळे, सुरज निकाळजे, संदेश घेवंदे, तेजस झऱ्हाडे, शुभम गावडे यांच्यासह इतर तरुणांनी वैदूवाडी येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता ग्रामपंचायतीकडून तयार करून घेण्याचा निर्धार केला आहे.

अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना करावी लागते कसरत 
ग्रामपंचायत हद्दीत वैदूवाडी येथे स्मशानभूमी तयार आहे; मात्र तिकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागते. कालच गावातील एका तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते; परंतु स्मशानभूमीकडे जाण्यासाठी अनेकांना कसरत करावी लागली. काहींना लांब अंतरावर उभे राहावे लागले. ही बाब युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्मशानभूमीकडे सिमेंट काँक्रीट रस्ता ग्रामपंचायतीमार्फत तयार करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

ग्रामपंचायतींला ठाेकणार टाळे 
या मागणीची दखल न घेतल्यास २ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायतीला टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा युवकांनी दिला आहे. तसेच जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत उघडू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.