एकदिलाने काम करा! मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्या! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान; चिखली तालुका शिवसेनेची घेतली आढावा बैठक!
५ एप्रिलच्या शिवसेना पक्ष प्रवेश सोहळ्याच्या नियोजनाचाही घेतला आढावा..
Updated: Mar 30, 2026, 09:17 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना हा सामान्य कार्यकर्त्याला महत्त्व देणारा पक्ष आहे. शिवसैनिकाला केंद्रबिंदू मानणारा पक्ष आहे, गटातटांचे राजकारण शिवसेना पक्षात नसते. त्यामुळे शिवसेनेचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी एक दिलाने, एक मनाने काम करावे.. जिल्हा परिषद सर्कल मध्ये, शहरी भागात प्रभागामध्ये शिवसेना पक्षाची ताकद वाढवावी असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. चिखली येथील राधाबाई खेडेकर विद्यालयात तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक २९ मार्च रोजी ना.जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते..यावेळी मंचावर उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, तालुकाप्रमुख गजानन मोरे, शहर प्रमुख विलास घोलप, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद हाडे, नगर परिषदेच्या उपाध्यक्ष वैशाली खेडेकर, शिवसेना शिक्षक सेनेचे वसंतराव गाडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना ना.जाधव म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची लोकप्रियता वाढत आहे. मुख्यमंत्री कसा असतो हे एकनाथ शिंदेंच्या रूपाने अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. त्यांची काम करण्याची धडपड पाहून अनेक पक्षातील पदाधिकारी शिवसेना पक्षात प्रवेश करण्यासाठी तयार आहेत, तशी इच्छा अनेक पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. त्या सर्वांना सोबत घेऊन आपल्या पक्षाची ताकद वाढवावी. आगामी जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समिती निवडणूक या कार्यकर्त्यांच्या आहेत, त्यामुळे पक्ष संघटन वाढविण्याच्या उद्दिष्टाने येत्या ५ एप्रिलला चिखलीत शिवसेना पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे, या कार्यक्रमाचे योग्य नियोजन शिवसेनेच्या अंगीकृत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी करावे असे आवाहन ना.जाधव यांनी केले. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे कोणताही मित्र दुखावेल अशा भाषेत टीका करू नका, मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्या असे म्हणत ना.जाधव यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. पुढच्या एक दोन महिन्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे आपल्या सर्कलमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्कल मजबूत करा असे आवाहन त्यांनी केले.