आ.सिद्धार्थ खरातांना मेहकरात जमले ते लोणारमध्ये का नाही? स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराचा गेम केला; विधानसभेत बच्छिरेंनी मागितले होते आमदारकीचे तिकीट! नगरपालिकेत नगराध्यक्षासाठी "डिपॉझिट" गोल...
Dec 22, 2025, 19:16 IST
लोणार( सचिन गोलेच्छा:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय... बातमीच्या शीर्षकात जो सवाल आणि शंका उपस्थित केली आहे ती लोणारच्या चौकाचौकात नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर नगरपालिकेत किशोर गारोळेंच्या रूपाने दमदार विजय खेचून आणला..त्यासाठी ते जिवाचे रान करतांना दिसले. मात्र त्यांना जे मेहकरमध्ये जमले ते लोणार मध्ये जमले नाही. लोणारात मशालीचे पेटणे तर दूरच साधी "चिंगारी" सुद्धा पेटली नाही.२० पैकी एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवार रंजना गोपाल बच्छीरे चौथ्या क्रमांकावर राहिल्या, डिपॉझिटही जप्त झाले.
उबाठा शिवसेनेचे जिल्हा संघटक असलेले गोपाल बच्छीरे यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे तिकीटाची मागणी केली होती. त्यावेळी घडलेल्या घडामोडीत त्यांनी सिद्धार्थ खरातांना टीकेचे लक्षही केले होते. पक्षाने खरात यांना उमेदवारी दिल्यावर बंडखोरी करीत अपक्ष अर्जही भरला होता. कशीबशी "तडजोड" झाल्यानंतर गोपाल बच्छीरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. नंतरच्या घडामोडीत सिद्धार्थ खरात दमदार विजय मिळवत आमदार झाले. मात्र गोपाल बच्छीरे यांनी केलेल्या "तोडीचा..तडजोडीचा" राग त्यांच्या मनातून काही गेला नाही म्हणतात..आता वेळ गोपाल बच्छीरे यांची होती, नगराध्यक्ष पदाचे तिकीट तर त्यांनी पत्नीला मिळवून दिले,मात्र त्यांना डिपॉझिट वाचवता आले नाही, मते मिळाली ती केवळ ६४२... विशेष म्हणजे लोणारात उबाठा शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा भाजपचा परफॉर्मन्स चांगला आहे. भाजपच्या उमेदवार पार्वती इरतकर यांनी २४४२ , शिंदेंच्या शिवसेनेच्या संगीता मापारी २५७९ तर विजयी उमेदवार मीरा मापारी ६४६७ मते घेतली. उबाठा शिवसेनेचा आमदार असताना एक नगरसेवक देखील त्यांना निवडून आणता आला नाही..आता लोकांच्या तोंडाला काय हात लावता? लोकं म्हणते की आमदार सिद्धार्थ खरातांनी गोपाल बच्छीरेंचा गेम केला..केलाही असेल गेम पण दोघांच्या भांडणात गेम झाला तो "उबाठा शिवसेनेचा"...