सत्ता कोणाची? बुलढाण्यात निकालाची घडी बसली! नगरपरिषद मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; २१ डिसेंबरला राजकीय भवितव्य ठरणार

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील १० नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे मतदान २ डिसेंबर रोजी पार पडले असून, आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गोटांत उत्सुकता ताणलेली असताना, निवडणूक प्रशासनाने मतमोजणीसाठी संपूर्ण तयारी पूर्ण केल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
दरम्यान, देऊळगाव राजा नगरपरिषद तसेच खामगाव, शेगाव व जळगाव जामोद या नगरपरिषद क्षेत्रांतील ७ प्रभागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

राज्य निवडणूक आयुक्तांचा थेट आढावा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीला विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणी व मतदानपूर्व तयारीची सविस्तर माहिती सादर केली.

११ केंद्रांवर रंगणार निकालाचा रणसंग्राम

जिल्ह्यात एकूण ११ मतमोजणी केंद्रांवर निकाल प्रक्रिया पार पडणार आहे. देऊळगाव राजा नगरपरिषद क्षेत्रातील १० प्रभाग, जळगाव जामोद येथील २, खामगाव येथील ४ आणि शेगाव येथील १ अशा १७ प्रभागांतील ३० सदस्य पदांसाठी मतदान होणार आहे.

या निवडणुकीसाठी एकूण ५८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये देऊळगाव राजा (३०), खामगाव (१८), जळगाव जामोद (६) व शेगाव (४) मतदान केंद्रांचा समावेश आहे. यातील खामगाव येथील ९ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.

पोलीस बंदोबस्त कडक; कोणतीही अनुचित घटना टाळणार

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान व मतमोजणीसाठी ३४९ अधिकारी-कर्मचारी, तसेच २३३५ पोलीस अधिकारी व कर्मचारी, ५ आरसीपी व १२ एसआरपीएफ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली.

‘या’ ठिकाणी होणार मतमोजणी

राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार पुढील ठिकाणी मतमोजणी होणार आहे —

• बुलढाणा – नगरपरिषद सभागृह

• चिखली – तालुका क्रीडा संकुल

• देऊळगाव राजा – नगरपरिषद सभागृह (दुसरा मजला)

• जळगाव जामोद – नगरपरिषद योगा हॉल

• खामगाव – राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह, तहसील कार्यालय

• लोणार – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

• मलकापूर – शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय

• मेहकर – तालुका क्रीडा संकुल

• नांदुरा – तहसील कार्यालय

• शेगाव – तहसील विभाग, एमएससीबी चौक

• सिंदखेड राजा – नगरपरिषद सभागृह

स्ट्राँगरूमवर करडी नजर

मतपेट्या ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरूमच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा, २२ पोलीस अधिकारी, २२० पोलीस अंमलदार (एकूण ४४० पोलीस) व ११ एसआरपीएफ तुकड्यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

निर्भय वातावरणात निवडणूक’ – आयुक्तांचे निर्देश

आढावा बैठकीत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांसाठी निवडणूक व पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले.