व्हाईस ऑफ मीडियाला मिळणार दोन नवे जिल्हाध्यक्ष! कृष्णा सपकाळ यांनी सोपवला प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्केंकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा...

 
बुलडाणा(बुलडाणा  लाइव्ह वृत्तसेवा): जगातील सर्वात मोठी संघटना असलेल्या व्हाईस ऑफ मीडियामध्ये संघटनात्मक बदलाचे वारे वाहत आहेत. बुलढाणा जिल्ह्याला आता नव्याने नव्या रचनेनुसार दोन जिल्हाध्यक्ष मिळणार आहेत. पंढरपूर येथे १५ आणि १६ डिसेंबरला व्हाईस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन होत असून या अधिवेशनात नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा होणार आहे. दरम्यान आतापर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणारे कृष्णा सपकाळ यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्याकडे सुपूर्द केला आहे. 
व्हॉईस ऑफ मीडियाचे संघटन दिवसेंदिवस वाढत आहे. पत्रकार आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी व्हॉईस ऑफ मीडिया काम करत असून जगभरातील ५१ देशांमध्ये संघटनेचे काम चालते. बुलडाणा जिल्ह्यातही सर्वात मोठी पत्रकार संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत कृष्णा सपकाळ यांनी संघटनेत जिल्हा कार्याध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत, मात्र आता राजकीय क्षेत्रातील जबाबदारीमुळे त्यांनी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दुसऱ्या सक्षम व्यक्तीकडे देण्यात यावी अशी विनंती त्यांनी प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्याकडे केली होती. त्यावर राज्य कार्यकारिणीच्या कोअर कमिटीत चर्चा झाल्यानंतर आता सपकाळ यांनी राजीनामा प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्याकडे सोपवला आहे. 

  संघटना सर्वोच्च:  कृष्णा सपकाळ 

  आतापर्यंत व्हाईस ऑफ मीडियाने खूप ओळख दिली. व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी काम करता आले. मात्र आता राजकीय क्षेत्रातील जबाबदारीमुळे संघटनेच्या कामाकडे अपेक्षित वेळ देता येत नाही. त्यामुळ ही जबाबदारी नव्या व्यक्तीकडे सोपवली पाहिजे, संघटनेसाठी अधिक वेळ देणाऱ्या व्यक्तीकडे ही जबाबदारी सोपवली पाहिजे या हेतूने राजीनामा दिल्याचे कृष्णा सपकाळ यांनी सांगितले. यापुढेही व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेत सदस्य या नात्याने कार्यरत राहणार आहे, कारण संघटना सर्वोच्च आहे असेही  ते म्हणाले..

दोन नव्या जिल्हाध्यक्षांची पुढील आठवड्यात घोषणा: अनिल म्हस्के

   कामाच्या अधिकच्या व्यापामुळे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवण्याची विनंती कृष्णा सपकाळ यांनी केली होती. जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द उल्लेखनीय राहिली आहे. यापुढेही ते संघटनेत कार्यरत राहणार आहेत. त्यांचा राजीनामा प्राप्त झाला असून आता नव्या रचनेनुसार पंढरपूर येथील राज्य अधिवेशनात दोन नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के म्हणाले...